विश्वचषकात भारतीय संघाच्या पदरी पराभव पडल्यानंतर धोनीने दोन महिने क्रिकेटमधून विश्रांती घेतली. दरम्यानच्या काळात ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र फलंदाजीत ऋषभ सतत अपयशी ठरत असल्यामुळे चाहत्यांकडून धोनीच्या पुनरागमनाची मागणी होऊ लागली. मात्र धोनीने आपली सुट्टी नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढवत आपलं पुनरागमन लांबवणीवर टाकलं. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवननेही धोनीची पाठराखण करत, निवृत्ती कधी घ्यायची हे धोनीला चांगलं कळतं असं वक्तव्य केलं आहे.
“गेली अनेक वर्ष धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो आहे. आपण कधी निवृत्ती घ्यायची हे त्याला चांगलं माहिती असणार. निवृत्तीचा निर्णय त्यानेच घ्यायला हवा, आतापर्यंत भारतीय संघासाठी त्याने अनेक खडतर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी तो निवृत्तीचा निर्णय घेईल.” India TV वाहिनीवरील ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात शिखर धवन बोलत होता.
काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, महेंद्रसिंह धोनी विश्वचषकात पाठीला दुखापत झालेली असतानाही खेळला. याच दुखापतीमुळे धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. डिसेंबर महिन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यातच ऋषभ पंतचं फलंदाजीतलं अपयश पाहता धोनी विंडीजच्या भारत दौऱ्यात संघात पुनरागमन करेल असं बोललं जातंय.
अवश्य वाचा – चहूबाजूंनी टीका होत असतानाही गांगुली म्हणतो, पंतच भारतीय संघासाठी योग्य!