भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पाहण्यासाठी चाहते आगामी आयपीएलची आतुरतेने वाट बघत आहेत. यूएईत झालेल्या आयपीएलच्या मागील हंगामात धोनी काही खास कामगिरी करू शकला नव्हता. पण यावेळी चाहत्यांना आशा आहे, की माही त्याच्या जुन्या रूपात दिसणार आहे.
चेन्नई सुपर किंग्जने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये धोनी सराव सत्रादरम्यान मोठे फटके मारताना दिसत आहे. सरावादरम्यान धोनीच्या बॅटमधून गगनचुंबी षटकारही आपल्याला दिसत आहेत. धोनीसेनेसाठी मागील हंगाम चांगला गेला नसला, तरी यंदा धोनी आपल्या संघाला प्लेऑफ आणि त्याच्यापुढील प्रवासाला गती देईल, असा चाहत्यांना विश्वास आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नई सुपर किंग्ज प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता.
View this post on Instagram
आयपीएल 2020 मध्ये धोनीने 14 सामन्यांत केवळ 200 धावा केल्या, ज्यामध्ये त्याचा सर्वोत्तम धावसंख्या 47 अशी होती. आयपीएलच्या 13व्या सत्रात सीएसके 7व्या स्थानी होता. यावेळी सीएसके 10 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळून आपल्या आयपीएल मोहिमेला प्रारंभ करेल. भारतीय संघात दमदार कामगिरी केलेला ऋषभ पंत यावेळी दिल्लीचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे एका बाजूला पंत तर, दुसरीकडे त्या गुरू धोनी अशी स्पर्धा रंगणार आहे.
”संघांच्या प्रवासावर कर्फ्युचा परिणाम नाही”
महाराष्ट्रात आठवड्याच्या शेवटी कडक निर्बंध लावल्यामुळे आयपीएलमधील मुंबईतील संघ हॉटेल ते वानखेडे स्टेडियमपर्यंत कसे प्रवास करणार यासंबंधी शंका निर्माण झाली होती. मात्र, या सामन्यांच्या आयोजनात कोणताही अडथळा येणार नसल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. एएनआयशी दिलेल्या या प्रतिक्रियेत अधिकाऱ्याने सांगितले की, संघ जैव सुरक्षित वातावरणात आहेत. ते बसने प्रवास करणार आहेत, हा एक बायो बबलचाच भाग आहे. त्यामुळे कोणतेही संकट येणार नाही.