एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यात कोहली अपयशी
भारताचा संघनायक महेंद्रसिंग धोनीने यंदाच्या क्रिकेटमय वर्षांवर आपला ठसा उमटवताना सलग सहाव्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय संघात स्थान मिळवले असून नेतृत्वाची धुराही त्याच्याकडे सोपवण्यात आली आहे. याचप्रमाणे दोन्ही संघांची यष्टिरक्षणाची जबाबदारीसुद्धा धोनीच्याच खांद्यावर आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील विशेष निवड समितीने आयसीसीचे वार्षिक कसोटी आणि एकदिवसीय संघ जाहीर केले असून, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने सलग सहाव्यांदा कसोटी संघात स्थान मिळवण्याचा पराक्रम दाखवला आहे. परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या कोहलीला मात्र आयसीसीच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे.
आयसीसीच्या एकदिवसीय संघात सात देशांमधील १२ खेळाडूंचा समावेश आहे. २०१३मध्ये आयसीसी चॅम्पियन्स करंडक जिंकण्याची किमया साधणाऱ्या धोनीकडेच एकदिवसीय संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. या संघात श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि लसिथ मलिंगा यांचा समावेश आहे.
आयसीसीच्या कसोटी संघात चार देशांमधील १२ खेळाडूंचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हशिम अमला याला चौथ्यांदा या संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच सलग तिसऱ्यांदा संघात स्थान मिळवणारा इंग्लंडचा कप्तान अॅलिस्टर कुककडे आयसीसीच्या कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.
कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीमध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस, इंग्लंडचा माजी कप्तान अॅलेक स्टीवर्ट, दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज ग्रॅम पोलॉक, न्यूझीलंडची माजी क्रिकेटपटू कॅथरिन कॅम्पबेल यांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा