इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत दारुण पराभव झाल्याने भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर जोरदार टीका होत आहे. मात्र बिलिअर्ड्सपटू पंकज अडवाणीच्या रूपाने धोनीला खंदा समर्थक मिळाला आहे. धोनी उत्तम कर्णधार आहे आणि तोच संघाचे सक्षम नेतृत्व करू शकतो असे मत पंकजने व्यक्त केले.
‘सध्याच्या संघात धोनी हाच कर्णधारपदाचा सर्वोत्तम पर्याय आहे. तो जिगरबाज खेळाडू असून, परिपक्व पद्धतीने गोष्टी हाताळू शकतो. भारतीयांच्या मानसिकतेनुसार विजय किंवा पराजयाने आपण अतिउत्साहित होतो. आपण सातत्य या मुद्याचा विचार करत नाही. काही दिवसांपूर्वी याच भारतीय क्रिकेट संघाचे गोडवे गायले जात होते आणि आता हाच संघ टीकेचे लक्ष्य ठरला आहे. हाच संघात मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या मालिकेत विजय मिळवेल आणि पुन्हा कौतुकाचा वर्षांव सुरू होईल’, असे पंकजने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘उगाच टीका करणे योग्य नाही, प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यांची उकल करणे आवश्यक आहे. भारतीय संघाचा हा पहिला पराभव नाही. खेळाडूंना आणि संघांना चढ-उतारांचा सामना करावा लागतो. ते अशा पराभवातून किती लवकर पुनरागमन करू शकतात हे महत्त्वाचे आहे’.

Story img Loader