आतापर्यंतच्या माझ्या कारकीर्दीमध्ये दडपण हाताळण्यामध्ये महेंद्रसिंग धोनी हा मला सर्वोत्तम कर्णधार वाटतो, असे मत भारताचा मध्यमगती गोलंदाज आशीष नेहराने व्यक्त केले आहे.
‘मी १९९९ साली मोहम्मद अझरच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. त्यानंतर मी बऱ्याच कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलो, पण दडपण हाताळण्यामध्ये मला सर्वात माहीर धोनीच वाटतो. महत्त्वाच्या क्षणी तो कधीही गांगरून जात नाही, तो नेहमीच शांत असतो. त्याचासारखा दडपणाचा सामना आतापर्यंत उत्तमरीत्या कुणीही केलेला नाही,’ असे नेहरा म्हणाला.
नेहराने आतापर्यंत एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये बरेच सामने खेळले आहेत. पण फक्त १७ कसोटी सामन्यांमध्येच देशाचे नेतृत्व करायला मिळाल्याची खंत त्याला आहे. याबाबत नेहरा म्हणाला की, ‘धोनी आणि प्रशिक्षक गॅरी कस्र्टन यांनी २००९ साली मला कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याबाबत विचारणा केली होती. त्या वेळी माझे वय ३२ होते. तरीही मी त्यांना सकारात्मक उत्तर दिले. पण त्या वेळी मला खेळण्याबाबत शाश्वती नव्हती. पण आता मी ३५ वर्षांचा असूनही सहा आठवडय़ांमध्ये सहा चार दिवसीय सामने खेळू शकतो.’
कानपूरला आयपीएलचा एकच सामना
कानपूर : येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर यंदाच्या आयपीएल स्पर्धेचा एकच सामना खेळवण्यात येणार आहे. कानपूरला दोन सामने खेळवण्यात यावे, अशी मागणी उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेने केली होती. पण कानपूरमध्ये फक्त एकच पंचतारांकित हॉटेल आहे, त्याचबरोबर विमानतळापासून कानपूर ७१ किलोमीटर लांब आहे. या दोन मुद्दय़ांमुळे कानपूरला फक्त एकच सामना खेळवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आता ग्रीन पार्कवर गुजरात लायन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना खेळवण्यात येणार आहे.