MS Dhoni On Virat Kohli : दिग्गज विकेटकीपर-फलंदाज एमएस धोनी आणि विराट कोहली यांनी जवळपास ११ वर्ष एकत्र भारतासाठी क्रिकेट खेळले आहे. कोहलीने धोनीच्या नेतृत्वाखालीच त्याचा पहिला सामना खेळला होता. तर धोनीने २०१९ मध्ये कोहलीच्या नेतृत्वात त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. माजी भारतीय कर्णधार धोनी आणि कोहली यांचे एकमेकांबरोबर खूप घट्ट नाते राहिले आहे. त्यांचे हे नाते गेल्या काही वर्षांमध्ये मैत्रीमध्ये बदलले आहे.

दरम्यान धोनीने नुकतेच त्याच्या आणि विराट कोहलीच्या मैत्रीबद्दल खुलेपणाने भाष्य केले आहे. सीएसकेचा माजी कर्णधार धोनीने नुकतेच जीओ हॉटस्टारला एक मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये त्याने सांगितलं की, “मी आणि विराटमध्ये सुरुवातीपासूनच चांगले नाते राहिले आहे. तो असा व्यक्ती आहे, जो संघासाठी योगदान देऊ इच्छितो. तो कधीच ४० किंवा ६० धावा काढून खूष होत नाही. त्याला १०० धावा करून शेवटापर्यंत नॉटआऊट राहायचे असते. त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच भूक होती. ज्या प्रकारे त्याने त्याच्या फलंदाजीमध्ये सुधारणा केली आणि त्याच्या चांगली कामगिरी करण्याचा इच्छाशक्तीने त्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली. त्याने त्याच फिटनेस स्तर उंचावला आणि नेहमीच मैदानावर आपली उपस्थिती दाखवून दिली. तो नेहमीच असा होता.”

एमएस धोनी पुढे बोलताना म्हणाला की, “तो येऊन बोलायचा, ‘मी आता काय करू शकलो असतो… या धावांच्या पाठलागावेळी, या क्षणाला मी बाद झालो, मी काहीतरी वेगळे करू शकलो असतो’. आम्ही खूप गोष्टींवर बोललो, ज्यामुळे आमच्यात मोकळेपणा आला. मी फक्त प्रामाणिक मत द्यायचो. जसं की, ‘तू असं करू शकत होतास, याला एक ओव्हरसाठी टाळू शकला असता’ किंवा ‘ही रिस्क तू घ्यायला हवी होती’. आणि अशा पद्धतीने आमचे नाते पुढे घट्ट होत गेले. हे नाते सुरूवातीला एक कर्णधार आणि एक तरूण खेळाडू यांच्याप्रमाणे होते मात्र कालांतराने आम्ही खूप चांगले मित्र बनलो. पण मला अजूनही वाटतं की आमच्यामध्ये एक लाइन आहे – सीनियर आणि ज्यूनियरची- तरीही आम्ही मित्र आहोत. आता आम्ही दोघेही कर्णधार नाहीत आणि त्यामुळे सामन्याच्या आधी बोलण्यासाठी जास्त वेळ मिळतो.”

कोहलीने टी२० वर्ल्ड कप २०२१ नंतर भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले होते. तसेच त्याला वनडे कर्णधार पदावरून बाजूला करण्यात आले होते. यानंतर कोहलीने जानेवारी २०२२ मध्ये टेस्ट कर्णधार पद देखील सोडलं. तेव्हा कोहलीने सांगितले होते की कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला फक्त एका व्यक्तीचा मेसेज आला होता, तो म्हणजे एमएस धोनीचा. मात्र धोनीने याबद्दल अधिक बोलण्यास नकार दिला.

दरम्यान एमएस धोनाच्या सीएसके आणि विराट कोहलीच्या आरसीबी संघाने आयपीएल २०२५ च्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. आता ते शुक्रवारी (२८ मार्च) चेपॉक येथे एकमेकांशी भिडतील.