आज (१५ ऑगस्ट) आपल्या भारत देशाला स्वातंत्र्यमिळून ७५वर्षे पूर्ण झाली आहेत. दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळ संघर्ष केल्यानंतर देशाला गुलामगिरीतून मुक्ती मिळाली होती. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक मोठ्या अभिमानाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक घरोघरी तिरंगा फडकवण्याची मोहीम राबविण्याचे आवाहन केले होते. या अंतर्गत नागरिकांनी सोशल मीडियावरही त्यांच्या प्रोफाईल फोटच्याजागी तिरंग्याचा फोटो लावला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीसुद्धा या मोहिमेत सहभागी झाला आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम डीपीबदलून तिरंग्याचा फोटो लावला आहे.
महेंद्रसिंह धोनी सोशल मीडियापासून कायमच दूर राहण्याचा प्रयत्न करतो. तो क्वचितच सोशल मीडियाअकाऊंचा वापर करून पोस्ट करतो. त्यामुळे स्वातंत्र्यदिनानिमित्त त्याची सोशल मीडिया अॅक्टिव्हिटी चर्चेचा विषय ठरली आहे. धोनीने शुक्रवारी त्याचा इन्स्टाग्राम प्रोफाइल फोटो बदलून त्यावर तिरंग्याचे चित्र लावले आहे. या चित्रात संस्कृतमध्ये, ‘धन्यः अस्मि भारततत्वेन’ असे वाक्य लिहिलेले आहे. ‘माझे नशीब आहे, मी भारतीय आहे’, असे त्या ओळीचा अर्थ होतो. धोनीच्या या प्रोफाइल फोटोची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. चाहत्यांनीही त्याच्या देशभक्तीचे कौतुकही केले आहे.
धोनी सोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय असतो. मात्र, ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होऊन धोनीने देश आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट या दिवसाचे धोनीच्या आयुष्यात एक वेगळे महत्त्व आहे. १५ ऑगस्ट २०२० रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती.
हेही वाचा – मोहम्मद शमीच्या पत्नीचे पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाली, “देशाचे नाव…”
धोनीशिवाय इतर अनेक क्रिकेटपटूंनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभाग घेतला आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, इरफान पठाण, गौतम गंभीर यांनीही आपल्या घरी तिरंगा फडकवला आहे. यासोबतच त्यांनी चाहत्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे. माजी कर्णधार विराट कोहलीनेही आपल्या ट्विटर अकाउंटवर डीपीच्या जागी तिरंग्याचा फोटो लावला आहे.