भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला निवृत्त होऊन चार वर्षे उलटली आहेत. तरी धोनी सतत त्याच्या क्रिकेट आणि क्रिकेटव्यतिरिक्त गोष्टींमुळे चर्चेत असतो. तो इंडियन प्रीमियर लीगमधून अद्याप निवृत्त झालेला नाही. दरम्यान, धोनीच्या २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी घडलेली धोनीबाबतची एक गोष्ट समोर आली आहे. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताला न्यूझीलंडने पराभूत केलं होतं. तोच धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला शेवटचा सामना होता. त्या विश्वचषक स्पर्धेत धोनी त्याच्या बॅटवर BAS कंपनीचं स्टिकर लावून खेळत होता. या स्टिकरमागे एक रोचक गोष्ट आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

BAS कंपनीचे मालक सोमी कोहली यांनी नुकतीच ही गोष्ट शेअर केली आहे. कोहली यांनी सांगितलं की, धोनीने त्यावेळी कुठल्याही प्रकारचं शुल्क न आकारता त्याच्या बॅटवर BAS चा लोगो आणि स्टिकर लावलं होतं. त्याऐवजी धोनीने दुसऱ्या एखाद्या कंपनीशी करार करून त्या कंपनीचं स्टिकर आणि लोगो लावला असता तर त्याला कोट्यवधी रुपये मिळाले असते.

समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये BAS चे मालक सोमी कोहली यांनी सांगितलं की, धोनी आमच्याकडे आला आणि म्हणाला की मला BAS चं स्टिकर माझ्या बॅटवर लावून खेळायचं आहे. मी धोनीला त्यासाठी पैसे देऊ केले. परंतु, त्याने पैसे घेण्यास नकार दिला. मी धोनीला म्हटलं की प्लीज माझ्याकडून या जाहिरातीचे पैसे घे. परंतु, त्याने नकार दिला. मी धोनीची पत्नी साक्षी आणि त्याच्या आई-वडिलांनाही सांगितलं की, धोनीने माझ्याकडून पैसे घ्यायला हवेत. परंतु, धोनी स्पष्ट शब्दांत पैसे घेण्यास नकार दिला.

धोनी जेव्हा स्टार क्रिकेटपटू नव्हता तेव्हा BAS ने धोनीची आर्थिक मदत केली होती. त्यामुळेच धोनीने तो स्टार क्रिकेटपटू झाल्यानंतर BAS कडून पैसे घेतले नाहीत. धोनी सध्या आयपीएल २०२४ ची तयारी करत आहे. स्पर्धेच्या आधी तो नेट्समध्ये अनेक तास सराव करतोय. फलंदाजी आणि यष्टीरक्षणाच्या सरावासाठी, फिट राहण्यासाठी मैदानावर घाम गाळताना दिसतोय.

हे ही वाचा >> किशनच्या वर्तणुकीमुळे ‘बीसीसीआय’ला जाग! ‘आयपीएल’ सहभागासाठी रणजी खेळणे अनिवार्य करण्याची शक्यता

धोनीने ७ नंबरची जर्सी का निवडली?

महेंद्रसिंह धोनी अनेक वर्षे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ क्रमांक असलेली जर्सी घालून खेळत आला आहे. तो अजूनही आयपीएलमध्ये याच क्रमांची जर्सी वापरतोय. दरम्यान,धोनीने नुकतंच एका कार्यक्रमात जर्सीसाठी ७ हा क्रमांक का निवडला यामागचं कारण स्पष्ट केलं. धोनी म्हणाला, मी पृथ्वीवर पाऊल ठेवण्यासाठी माझ्या आई-वडिलांनी ७ जुलै १९८१ हा दिवस ठरवला होता. मी सातव्या महिन्यातील सातव्या दिवशी जन्मलो. १९८१ हे वर्ष होतं. ८ मधून १ हा अंक वजा केला तर ७ हे उत्तर येतं. म्हणून मी ७ नंबरची जर्सी निवडली. जेव्हा मला विचारण्यात आलं की, तू कुठल्या क्रमांकाची जर्सी परिधान करणार? तेव्हा जर्सीचा क्रमांक ठरवणं माझ्यासाठी खूप सोपं होतं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni refuse to take crores of rupees for bat sticker bas owner tells thala heartwarming story asc