हो-नाही, हो-नाही म्हणता म्हणता अखेर तो दिवस येऊन ठेपलाच. कोणाच्या ध्यानीमनी नसताना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने स्वातंत्र्य दिनाच्या संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक, संघाला सर्वाधिक आयसीसी विजेतेपदं मिळवून देणारा कर्णधार, सर्वोत्तम यष्टीरक्षक अशी धोनीची अनेक रुपं आपण पाहिली. सचिन, गांगुली, सेहवाग यासारख्या खेळाडूंच्या मांदियाळीत महेंद्रसिंह धोनी नावाचा एक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करेल आणि कोट्यवधी भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनेल अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. परंतू शांत डोक्याच्या धोनीने ही किमया करुन दाखवली. कोणताही अनुभव नसताना हातात आलेलं भारतीय संघाचं कर्णधारपद धोनीने चांगल्या पद्धतीने निभावलं. मैदानात शांत राहून प्रतिस्पर्ध्याची प्रत्येक चाल बारकाईने ओळखणारा धोनी भारतीय संघाचा आधारस्तंभ झाला होता.

गेल्या वर्षभरापासून धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरु आहे. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनीला टीकाही सहन करावी लागली. वर्षभरासाठी धोनी भारतीय संघाबाहेर होता. पण गेली काही वर्ष भारतीय संघाचा भार आपल्या खांद्यावर वाहणाऱ्या धोनीने कोणताही गाजावाजा न करता, कोणत्याही प्रकारे प्रसिद्धीसाठी प्रयत्न न करता निवृत्त व्हायचं ठरवलं. साहजिकच आहे, धोनीच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते नाराज झाले असणार. अनेकांनी तो आगामी टी-२० विश्वचषकात खेळेल अशी आशाही बाळगली होती. पण धोनीच्या स्वभावाचा आणि त्याच्या शैलीचा विचार केला असता त्याने योग्य वेळी निवृत्ती स्विकारली असंच म्हणता येईल.

भारतीय चाहत्यांना हिरो हवा असतो –

ज्या देशात क्रिकेटला धर्माचं रुप दिलं जातं त्या देशात खेळाडूंना मिळणारी प्रसिद्धी हा काही नवीन विषय नाही. भारतीय चाहत्यांची एक खास सवय आहे. प्रत्येक दशकात त्यांना एका हिरोची गरज असते. नव्वदीच्या दशकातील पिढीसाठी सचिन हा देव किंवा हिरो होता. काहीही झालं तरीही सचिनने चांगलं खेळलंच पाहिजे अशी सर्वांची इच्छा असायची. सचिन बाद झाला की टिव्ही बंद…मग सामना पाहण्यात आम्हाला रस नाही अशी अनेक पालुपदं आपण ऐकली असतील. पण सचिनही माणूस आहे आणि तो ही कधी ना कधी थकणार हे अनेक भारतीय चाहत्यांनी कधी लक्षातच घेतलं नाही. सचिन निवृत्त झाल्यानंतर धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनला.

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात धोनी प्रचंड फॉर्मात होता. हेलिकॉप्टर शॉट, मैदानावर उभं राहून गोफण फिरव्यासारखी बॅट फिरवत फटके खेळणं अशा अनोख्या शैलीमुळे धोनीने चाहत्यांची मनं जिंकली. हेलिकॉप्टर शॉट हा तर ट्रेडमार्क स्टाईल बनला होता. धोनीच्या फलंदाजीत तंत्र नव्हतं…त्याच्या फटक्यांमध्ये सचिन,राहुल, विराट किंवा अगदी अजिंक्य रहाणे यांच्यासारखी नजाकत नव्हती. पण त्याची फटकेबाजी पाहत रहावी अशी होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक चाहत्यांनी धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची कॉपी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमलं नाही.

पण जी गोष्ट सचिनच्या बाबतीत झाली ती धोनीच्या बाबतीतही होणार हे त्याचे चाहते विसरतात. कितीही नाकारलं तरीही कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात धोनीची फलंदाजी ही संथ झाली होती हे मान्य करावंच लागेल. पुर्वीप्रमाणे फटकेबाजी होत नव्हती, वेगवान धावा जमत नव्हत्या. अशा परिस्थितीत धोनीचा खुबीने वापर करणं भारतीय संघाला आणि बीसीसीआयला गरजेचं होतं. दुर्दैवाने ती गोष्ट बीसीसीआयला जमली नाही. ज्या स्पर्धेत चाहत्यांना भारतीय संघाकडून अपेक्षा होत्या, नेमक्या त्याच स्पर्धेत धोनीची संथ खेळी भारताच्या पराभवाचं कारण ठरली आणि धोनी संघाबाहेर गेला.

धोनीच्या दर्जाचा खेळ करणं इतरांसाठी निव्वळ अशक्य –

फलंदाजी असो किंवा यष्टीरक्षण प्रत्येक बाबतीत धोनीने आपला दर्जा उंचावून ठेवला होता. प्रतिस्पर्धी फलंदाज कुठे फटका खेळणार याचा अचूक अंदाज धोनीला असायचा. त्याप्रमाणे फिल्डींग सेट करणं, गोलंदाजांना यष्टीमागून सल्ले देणं हे धोनी मोठ्या खुबीने करायचा. अनेकदा एखाद्या फलंदाजासाठी ठरवून जाळं लावत धोनी त्याची शिकार करायचा. स्टम्प माईकमध्ये त्याचं गोलंदाजांना सूचना देणं हे देखील आपण सर्वांनी एन्जॉय केलं. इतकच नव्हे तर DRS मध्ये त्याचा अंदाजही नेहमी योग्य ठरायचा. मेहनत आणि अनुभवाच्या जोरावर धोनीने ही अव्वल दर्जाची कामगिरी केली. सामन्याचं पारडं कोणत्या दिशेला झुकतंय याचा अंदाज घेऊन निर्णय घेणारा यष्टीरक्षक याआधी भारतीय संघात खचितच झाला असेल.

१० वर्षांपेक्षा जास्त काळ धोनी हा सर्व भार आपल्या खांद्यावर एकटा वाहत होता. या काळात धोनीचा उत्तराधिकारी कोण असेल यावर चर्चा करणं तर सोडा पण त्याचा शोध घेणंही बीसीसीआयला जमलं नाही. धोनी आहे ना बस्स झालं मग…या मनोवृत्तीतून अखेरपर्यंत भारतीय संघ धोनीवर विसंबून राहिला. आपण किंवा त्याचे चाहते जरी त्याला देव मानत असले तरीही धोनी हा माणूसच आहे. कधी ना कधी त्याचंही शरीर थकत असणार, त्याचाही फॉर्म खालावणार…याच विसंबून राहण्याच्या वृत्तीचा फटका भारतीय संघाला आता बसतो आहे.

धोनी संघाबाहेर गेल्यानंतर ऋषभ पंतला संधी देण्यात आली. परंतू यष्टीमागची ढिसाळ कामगिरी, बेजबाबदार फलंदाजी अशा एक ना अनेक कारणांमुळे पंत वाईट कारणांमुळे चर्चेत राहिला. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नसताना पंतकडून धोनीसारख्या कामगिरीची अपेक्षा करणं अयोग्य नाही का?? २०१७ चॅम्पिअन्स ट्रॉफीत भारत अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाला. धोनीच्या फलंदाजीतच्या उतरत्या काळाला त्यावेळपासूनच सुरुवात झाली होती. यानंतरच्या विंडीज दौऱ्यात संपूर्ण मालिकेत ऋषभ पंत बाकावर बसून होता. खरं पाहता पंतला अशावेळी संधी देऊन त्याला अनुभव आणि आत्मविश्वास देण्याची बीसीसीआयकडे संधी होती. पण धोनीला बाहेर कसं बसवायचं या प्रश्नाचं उत्तर न सापडल्यामुळे बीसीसीआयने कधीच तो निर्णय घेतला नाही.

धोनी निवृत्त…आता पुढे काय??

भारतीय संघासाठी कसोटीचा काळ आता खऱ्या अर्थाने सुरु होणार आहे असं माझं मत आहे. धोनी संघाबाहेर गेल्यानंतर भारतीय संघ अनेक गोष्टींवर उपाय शोधतो आहे. मधल्या फळीत फलंदाजी कोणी करायची, चौथ्या क्रमांकावर फलंदाज कोण येणार, यष्टीरक्षक म्हणून पंतला संधी द्यायची की सॅमसन??? असे अनेक प्रश्न भारतीय संघासमोर आहेत. धोनीने निवृत्ती जाहीर करेपर्यंत भारतीय चाहत्यांना तो पुन्हा संघात पुनरागमन करेल आणि पुन्हा सगळं काही पहिल्यासारखं होईल अशी आशा होती. पण आता धोनीशिवाय भारतीय संघाचा विचार करण्याची वेळ आली आहे…हे खुद्द धोनीनेच ओळखलं असेल.

करोनामुळे बदलेली परिस्थिती, बदललेले नियम लक्षात घेता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणं धोनीसाठी सोपं नव्हतं. अशावेळी भारतीय संघाला आपल्या शिवाय आत्मनिर्भर व्हावं लागेल हे कदाचित धोनीने ओळखलं असणार. धोनी मैदानात धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखला जायचा. टी-२० विश्वचषकात जोगिंदर शर्माकडून अखेरचं षटक टाकून घेणं असो किंवा केदार जाधवसारख्या कामचलाऊ फिरकीपटूचा खुबीने वापर करुन घेणं…धोनी आपल्या धुर्त चालींसाठी नेहमी ओळखला जायचा. यापुढे भारतीय संघाने आपल्या मदतीशिवाय वाटचाल करणं आणि आपले प्रश्न सोडवणं गरजेचं आहे…याची जाणीव झाल्यानंतर धोनीने आपल्या नेहमीच्या शैलीत कोणताही गाजावाजा न करता क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धोनीच्या या निर्णयाचाही भारतीय संघाला फायदाच होईल ही अपेक्षा…