भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांनी यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीला आपला पाठींबा दर्शवला आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर धोनीच्या निवृत्तीबद्दल अनेक उलट-सुलट चर्चांना जोर धरायला लागला. मात्र निवृत्ती कधी घ्यायची हा निर्णय सर्वस्वी धोनीचा असून, या चर्चांना काहीच अर्थ नसल्याचं किरमाणी यांनी स्पष्ट केलं आहे.
“आपल्या कारकिर्दीत धोनीने ज्या पद्धतीने भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे, ते पाहता तो भारताचा सर्वोत्तम कर्णधार आहे. कसोटी क्रिकेट असो किंवा वन-डे, टी-२० धोनीने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवन नेऊन ठेवलं आहे. निवृत्तीचा निर्णय त्याला घेऊ दे, आपण त्यामध्ये लुडबुड करायला नको. धोनीसारखी कामगिरी आतापर्यंत कोणीच करु शकलं नाहीये.” किरमाणी IANS वृत्तसंस्थेशी बोलत होते.
“एक दिवस कोणी ना कोणी धोनीची जागा घेणार आहे. सध्या आपल्याकडे ३-४ गुणवान क्रिकेटपटू भारतीय संघात आपली जागा पक्की करण्यासाठी तयार आहेत. यष्टीरक्षण हा मैदानातला सर्वात महत्वाचा भाग आहे.” संघात धोनीची जागा कोण घेणार या प्रश्नावर किरमाणी बोलत होते. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून ३० ऑगस्टपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.
अवश्य वाचा – ऋषभ अजुनही पाळण्यातच, साहाला संधी मिळायला हवी – सय्यद किरमाणी