२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीतचं संपुष्टात आलं. न्यूझीलंडने भारतावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. साखळी सामन्यादरसम्यान महेंद्रसिंह धोनीला त्याच्या संथ खेळीमुळे टीकेचं धनी व्हायला लागलं होतं. मात्र कर्णधार विराट कोहलीने वारंवार धोनीची पाठराखण केली होती. गेल्या काही दिवसांत प्रसारमाध्यमांमध्ये धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चांना उधाण आलेलं आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, कर्णधार विराट कोहलीने केलेल्या विनंतीनंतर, धोनीने आपल्या निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलल्याचं कळतंय.
“विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीला टी-२० विश्वचषकापर्यंत निवृत्त न होण्याची विनंती केली होती. यानंतरच धोनीने आपल्या निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलला.” विराट कोहलीच्या जवळील सुत्रांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहे. विराट कोहलीच्या मते धोनी अजुनही तंदुरुस्त आहे. त्यामुळे गरज पडल्यास आगामी टी-२० विश्वचषकापर्यंत धोनी संघात खेळू शकतो.
“भारतीय संघ व्यवस्थापनाला सध्या दुसरा यष्टीरक्षक संघात नको आहे. मात्र आगामी काळात ऋषभ पंत हा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असणार आहे. त्यामुळे पंतला मार्गदर्शन करण्यासाठी धोनीने काहीकाळ संघात रहावं, अशी विनंती संघ व्यवस्थापनाने केली होती. याचसोबत मधल्या काळात जर पंत दुखापतीमुळे खेळू शकला नाही, तर धोनी पर्यायी खेळाडू म्हणून त्याची जागा घेऊ शकतो.” सुत्राने प्रसारमाध्यमांना माहिती दिली. दरम्यान भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी धोनीची भारतीय संघात निवड झालेली नाहीये.
अवश्य वाचा – निवृत्तीची चर्चा सोडा, धोनीसाठी निवड समितीने आखली खास योजना ! जाणून घ्या…