महेंद्रसिंह धोनीकडून इतरांना शिकण्यासारखे खूप काही आहे. एक यशस्वी कर्णधार आणि अनुभवी क्रिकेटपटू या भूमिकेत वावरताना धोनी अनेकांसाठी आदर्शवत ठरला आहे. सोमवारी सराव सामन्यात धोनी आणि लोकेश राहुल बांगलादेशच्या गोलंदाजांविरुद्ध वरचढ ठरत असतानाच धोनीने ३९व्या षटकादरम्यान गोलंदाज शब्बीर रेहमानला मध्येच थांबवून क्षेत्ररक्षण बदलण्यास सांगितले. बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तझा यानेही धोनीचे म्हणणे ऐकत क्षेत्ररक्षणात बदल केले. धोनीच्या या भूमिकेनंतर मात्र समाजमाध्यमांवर चर्चेला ऊत आला आहे. ‘‘ही विश्वचषकातील सर्वोत्तम घटना घडली आहे.. माही प्रत्येकाला मार्गदर्शनपर सल्ले देत आहे.. धोनी आता प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराच्या भूमिकेतही पाहायला मिळणार आहे.. धोनीचा आपल्या क्षमतेवर इतका विश्वास आहे की, तो प्रतिस्पर्धी संघाचे क्षेत्ररक्षणही लावू लागला आहे,’’ अशा प्रकारे समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटत आहेत.