भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या खात्यावर अनेक विक्रम असले तरी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धोनीचे वेगळे रुप सर्वांसमोर आले. या सामन्यात धोनी चक्क वॉटरबॉय म्हणून मैदानात आला. धोनीच्या या खेळाडू वृत्तीचे सोशल मीडियावरुन भरभरुन कौतुक होत आहे.
मंगळवारी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीचा भारताचा दुसरा सराव सामना पार पडला. बांगलादेशविरुद्ध पार पडलेल्या या सराव सामन्यात धोनीचे वेगळे रुप दिसले. सामन्यातील ड्रिंक ब्रेकदरम्यान धोनी चक्क वॉटरबॉय म्हणजेच १२ वा खेळाडू म्हणून मैदानात आला. मैदानातील सहकाऱ्यांना धोनीने पाणी आणि एनर्जी ड्रिंक दिले. या सामन्यात भारताने बांगलादेशवर २४० धावांनी दणदणीत विजय मिळवला.
संघाचा माजी कर्णधार, खात्यात विक्रमांची मोठी यादी, प्रतिस्पर्धीं गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणारी फलंदाजी यासाठी धोनी ओळखला जातो. पण विक्रमांना गवसणी घातल्यानंतरही धोनीचे पाय अजून जमिनीवर असल्याचे यातून दिसून आल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.
https://twitter.com/lKR1088/status/869567595292315648
धोनीपूर्वी विराट कोहलीदेखील वॉटरबॉय म्हणून मैदानात आला होता. मार्चमध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारतात कसोटी मालिकेसाठी आला होता. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना होता. या सामन्यात दुखापतीमुळे कोहली मैदानाबाहेरहोता. पण सामन्यादरम्यान कोहली चक्क १२ वा खेळाडू म्हणून मैदानात पाणी घेऊन आला होता.