आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून झालेल्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनी एमएस धोनीबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरलेल्या या सामन्यात मुंबईने चेन्नईचा अवघ्या एका धावेने पराभव केला.

मुंबईकडून झालेल्या पराभवानंतर धोनी खूप निराश झाला. त्याला इतके उदास कधी पाहिले नव्हते असे संजय मांजरेकर यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. सामना संपल्यानंतर संजय मांजरेकर यांनीच सूत्रसंचालन केले. धोनी बरोबर बोलताना मला खूप वाईट वाटत होते. त्याला याआधी कधीही इतके निराश पाहिले नव्हते असे संजय मांजरेकर म्हणाले.

मुंबई इंडियन्सने दिलेल्या १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला शेवटच्या षटकात विजयासाठी नऊ धावांची गरज होती. मुंबईने लसिथ मलिंगाला शेवटचे षटक टाकण्यासाठी दिले. त्याने पहिल्या तीन षटकात ४२ धावा दिल्या होत्या. तीन जीवदाने मिळालेला शेन वॅटसन खेळपट्टीवर असल्यामुळे चेन्नईला विजयाची अपेक्षा होती.

पण मलिंगाने अखेरच्या षटकात भेदक मारा करत चेन्नईला विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या. अंतिम सामन्यात अनेक चुका झाल्या. सामन्याबद्दल आपला विचार व्यक्त करताना मांजरेकर म्हणाले की, उच्च दर्जाचे क्रिकेट खेळले गेले नाही. पण आयपीएलचा हा अंतिम सामना पाहायला मजा आली.

 

Story img Loader