भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव कायम होत असून, त्यामध्ये भारताचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू ग्रेग चॅपल यांचाही अपवाद नाही. धोनीचा स्वत:वर, त्याच्या गुणवत्तेवर अमाप विश्वास आहे. त्याला त्याच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास असल्यामुळेच तो आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करू शकतो. त्याच्याकडे असलेले तंत्र हे अद्भुत आहे, आतापर्यंत असे तंत्र बऱ्याच जणांमध्ये दिसत नाही, असे चॅपल म्हणाले.
चॅपेल पुढे म्हणाले की, ‘‘ धोनी ज्या पद्धतीने खेळाचा अभ्यास करतो, खेळ वाचतो, त्याला तोडच नाही, ते अद्भुत असेच आहे. तो नेहमी शांत असतो आणि त्याच्यामध्ये जी आत्मशक्ती आहे ती जास्त क्रिकेटपटूंमध्ये पाहायला मिळत नाही. त्याचा स्वत:वर फार विश्वास आहे. जर त्याने एखादी गोष्ट करण्याचे ठरवले तर त्यासाठी तो मेहनत घेतो आणि ती गोष्ट मिळवतोच. भारत किंवा ऑस्ट्रेलियातले खेळाडू पाहिले तर ते एखादी गोष्ट करण्यासाठी घाबरतात. कारण ही गोष्ट जर चुकीची ठरली तर त्याचे खापर त्यांच्या डोक्यावर फुटणार असते, पण धोनीच्या बाबतीत मात्र तसे नाही. तो एखाद्या गोष्टीच्या मागे ठामपणे उभा राहतो आणि जबाबदारीही घेतो.’’
धोनीने जेव्हा भारतीय संघात पदार्पण केले तेव्हा चॅपेल हे भारताचे प्रशिक्षक होते. त्याच्या यशाबद्दल चॅपेल सांगतात की, ‘‘संघाच्या ‘ड्रेसिंग रूम’मध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ खेळाडूंना एकत्रित आणण्याची त्याची क्षमता अतुलनीय अशीच आहे. काही वरिष्ठ खेळाडू संघातील इतर काही वरिष्ठ खेळाडूंना काही गोष्टी सांगताना कचरतात, त्यामध्ये त्यांच्या भावना गुंतलेल्या असतात. पण धोनीचे मात्र तसे नाही.’’
धोनीच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल चॅपेल म्हणाले की, ‘‘धोनी हा सुरुवातीला रस्त्यांवर मित्रांबरोबर खेळायचा, तिथून त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. कारण त्याने त्याच्या खेळाचा स्तर वाढवला. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर तो दर्जेदार कामगिरी करतो, याचे कारण म्हणजे तो नेहमीच स्वत:ला विद्यार्थी समजतो.’’
धोनी अपयशांना घाबरणारा नाही, याविषयी चॅपेल म्हणतात की, ‘‘सर डॉन ब्रॅडमन यांनी ८० डावांमध्ये २९ शतके झळकावली, म्हणजेच ५१ वेळा त्यांना अपयश आले, तर अन्य खेळाडूंना त्यांच्यापेक्षा जास्त वेळा अपयश आले आहे. तुम्ही अपयशांचा सामना करायला हवा, ते पचवायला हवे. आपल्याला अपयश येऊ शकते, याचा विचार धोनी करतो, त्यामुळेच त्याचे तंत्र एकमेवाद्वितीय ठरते. त्यामुळेच त्याच्यासारखे क्रिकेट अन्य खेळाडूंना खेळता येऊ शकत नाही.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा