मायदेशातील गेल्या काही मालिकांवर वर्चस्व गाजविल्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता परदेशात जाऊन दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर आपला जलवा दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे. पण या दौऱ्याला सुरुवात होण्याआधीच धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयसीसीच्या या वर्षांतील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर धोनीने मोहोर उमटवली आहे. तसेच आयसीसीच्या वार्षिक एकदिवसीय आणि कसोटी संघातही त्याने स्थान मिळवले आहे. एकदिवसीय संघाचे नेतृत्वही त्याच्याकडे सोपवण्यात आले आहे. वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि एकदिवसीय क्रिकेटपटू या पुरस्कारांसाठी धोनीला मानांकने मिळाली आहेत.
एलजी आयसीसीच्या वर्षांतील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर (पीपल्स चॉइस अ‍ॅवॉर्ड) भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाव कोरले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती पत्करणाऱ्या सचिन तेंडुलकरनंतर या पुरस्कारावर मोहोर उमटवणारा धोनी हा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
२०१०मध्ये पहिलावहिला लोकप्रिय क्रिकेटपटूचा पुरस्कार सचिनने पटकावला होता. त्यानंतर २०११ आणि २०१२मध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकाराने हा पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर हा मानाचा पुरस्कार प्राप्त करणारा धोनी हा तिसरा क्रिकेपटू ठरला आहे. या वर्षी मायकेल क्लार्क (ऑस्ट्रेलिया), अ‍ॅलिस्टर कुक (इंग्लंड), विराट कोहली (भारत), ए बी डी’व्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) यांना धोनीने मागे टाकले. बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी धोनीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
२०१० मध्ये बंगळुरू येथे हा पुरस्कार वितरण समारंभ झाला होता. या वर्षी लोकप्रिय क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी २ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत एक लाख ८८ हजार क्रिकेटरसिकांनी कौल दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा