महेंद्रसिंग धोनीच्या १९ चेंडूंतील ६३ धावांच्या वादळी खेळीच्या झंझावातासमोर चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादला पराभव पत्करावा लागला. चेन्नईने दिलेले २०३ धावांचे आव्हान हैदराबादला पेलवले नाही आणि चेन्नईने १२ धावांनी विजय मिळवला. सलग दुसऱ्या विजयासह चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत ‘ब’ गटात अव्वल स्थान राखले आहे.
मुरली विजय आणि माइक हसी झटपट बाद झाल्यानंतर सुरेश रैनाने चेन्नईचा डाव सावरला. त्याने ९ षटकार आणि एका षटकारासह ८४ धावांची खेळी केली. १७व्या षटकांत चेन्नईच्या ३ बाद १४१ धावा होत्या. यानंतर धोनीने थिसारा परेराच्या षटकांत ३४ धावांची लयलूट केली. शेवटच्या षटकांतही धोनीने दोन षटकार खेचत चेन्नईला दोनशेचा टप्पा गाठून दिला. धोनीने एक चौकार व तब्बल ८ षटकारांसह हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. हैदराबादच्या डेल स्टेन व जे. पी. डय़ुमिनी यांनी प्रत्येकी २ बळी टिपले.
या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन आणि पार्थिव पटेल यांनी ८८ धावांची वेगवान सलामी दिली. सुरेश रैनाच्या थेट धावफेकीवर पार्थिव धावचीत झाला तर धवनला अश्विनने धोनीकडे झेल देण्यास भाग पाडले. ही जोडी फुटल्यानंतर हैदराबादचे फलंदाज ठराविक अंतरात बाद झाले. डॅरेन सॅमीने ५० धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. हैदराबादने ७ बाद १९० धावांची मजल मारली. चेन्नईतर्फे ड्वेन ब्राव्हो आणि जेसॉन होल्डर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा