भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी निवृत्त होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. गुरूवारी सायंकाळी पत्नी साक्षी धोनीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. साक्षी धोनीनं ट्विट करत अफवा पसरवणाऱ्याची हवा काढली आहे. साक्षीने आपल्या ट्विटमध्ये धोनी निवृत्त होणार असल्याच्या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी संघाची घोषणा करताना निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनीही धोनीच्या निवृत्तीचं खंडन केलं. धोनीच्या निवृत्तीसंबंधीच्या बातम्या चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
Its called rumours !
— Sakshi Singh (@SaakshiSRawat) September 12, 2019
गुरूवारी सकाळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं केलेल्या ट्वीटमुळे धोनीच्या निवृत्तीबद्दल पुन्हा तर्क-वितर्क लावले जाऊ लागले. या फोटोमध्ये कोहली धोनीसमोर गुडघ्यावर बसलेला दिसत आहे. या फोटोला २०१६ टी-२० विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याचा संदर्भ होता. मात्र या फोटोमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली.
दरम्यान, यापूर्वीही अनेकदा धोनीच्या निवृत्तीच्या अफवा उडाल्या होत्या. २०१९ च्या विश्वचषकानंतर धोनी निवृत्ती जाहीर करणार असल्याची चर्चा रंगली होती.