Lucknow Super Giants, MSK Prasad: भारतीय माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष एम.एस. के प्रसाद यांची गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी लखनऊ सुपरजायंट्सने धोरणात्मक मार्गदर्शक सल्लागार म्हणून नियुक्ती केली. आपल्या नव्या भूमिकेत प्रसाद लखनऊ सुपर जायंट्स संघाला विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे गौतम गंभीरचे काय होणार, असा प्रश्न सध्या क्रिकेट वर्तुळात विचारला जातो आहे.
सुपर जायंट्सने एका निवेदनात म्हटले आहे की, “प्रसाद त्यांच्याबरोबर भरपूर अनुभव आणि क्रिकेट ऑपरेशन्समधील एक प्रभावी ट्रॅक रेकॉर्ड घेऊन आला आहे. तसेच, क्रिकेटमधील त्यांचा हा विश्वास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यास प्रवृत्त करतो.” सप्टेंबर २०१६ ते मार्च २०२०, ते भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष होते. माजी यष्टिरक्षक फलंदाज प्रसाद यांनी आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट ऑपरेशन्सच्या संचालकपदाचीही जबाबदारी सांभाळली होती. ४८ वर्षीय माजी क्रिकेटपटूने सहा कसोटी आणि १७ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून त्यात त्यांनी अनुक्रमे १०६ आणि १३१ धावा केल्या आहेत.
लखनऊचे पहिले दोन हंगाम शानदार होते
२०२२ पूर्वी आयपीएलमध्ये दोन नवीन संघ समाविष्ट केले गेले होते. त्यापैकी एक लखनऊ सुपर जायंट्स होती. लखनऊने के.एल. राहुलची आपला कर्णधार म्हणून निवड केली होती. आतापर्यंत खेळलेल्या आयपीएलच्या दोन्ही हंगामात हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. मात्र त्याला आतापर्यंत आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. परंतु २०२४ साठी, संघ आधीच तयारी करत आहे. काहीही झाले तरी आयपीएलच्या पुढच्या मोसमात चमकणाऱ्या ट्रॉफीवर त्याला नाव कोरायचे आहे. प्रसाद यांच्या येण्याने मार्गदर्शक गौतम गंभीरचे संघातील महत्व कमी होणार का? असाही एक प्रश्न क्रिकेटवर्तुळात विचारला जात आहे.
लखनऊचा कोचिंग स्टाफ २०२४ मध्ये असा असू शकतो
नुकतेच लखनऊ सुपर जायंट्सने आपले मुख्य प्रशिक्षकही बदलले आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अँडी फ्लॉवरच्या जागी जस्टिन लँगरची नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आगामी हंगामापूर्वी संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये आणखी बदल झाले नाहीत, तर ते असेच काहीसे दिसेल.
मुख्य प्रशिक्षक- जस्टिन लँगर
मार्गदर्शक- गौतम गंभीर
गोलंदाजी प्रशिक्षक – मोर्ने मॉर्केल
फील्डिंग कोच- जॉन्टी रोड्स धोरणात्मक सल्लागार- एमएसके प्रसाद