भारताचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही, तर अन्य पर्यायांचा विचार केला जाईल, असे वक्तव्य निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सोमवारी केले होते. या वक्तव्यावरून समाजमाध्यमामध्ये त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
प्रसाद हेदेखील भारताचे यष्टिरक्षक होते. त्यांची कामगिरी डोळ्यांमध्ये भरेल अशी नक्कीच नव्हती. त्यामुळे धोनीबाबत बोलताना आधी आपण काय केले आहे, याकडे लक्ष द्यावे, अशा शब्दांत एका क्रीडारसिकाने प्रसाद यांना सुनावले आहे. एका चाहत्याने तर ‘‘बीसीसीआयने तुम्हाला एका खेळाडूला यष्टिचीत करण्यासाठी विचारणा केली आहे का? जर कामगिरीचा विचार केला तर कामगिरीनुसार तुम्ही क्रिकेटच्या स्टेडियममध्येही प्रवेश करू शकत नाही,’’ अशी खरमरीत टीका ट्वीटवर केली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी संघनिवड करताना बऱ्याच खेळाडूंबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये धोनीचाही समावेश होता. आगामी विश्वचषकाचा विचार करता धोनीची कामगिरी कशी होते, यावर निवड समिती लक्ष ठेवून आहे. त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही तर त्याच्या जागी अन्य खेळाडूला संधी दिली जाईल, असे संघनिवडीच्या बैठकीनंतर निवड समितीचा सूर होता. याबाबतची माहिती प्रसाद यांनी दिली आणि त्यांच्यावर चाहत्यांनी जोरदार हल्ला चढवला.
‘‘धोनीने २०१९ चा विश्वचषक खेळावा की खेळू नये, हे ठरवणारे तुम्ही कोण आहात?’’ असा थेट सवाल प्रसाद यांना एका व्यक्तीने केला आहे.
प्रसाद यांनी भारताकडून खेळताना सहा कसोटी आणि १७ एकदिवसीय सामने खेळले होते. त्यामुळे त्यांनी भारताचा सर्वात यशस्वी ठरलेल्या कर्णधाराबद्दल असे वक्तव्य केलेले बऱ्याच जणांना रुचलेले नाही.
‘‘प्रसाद यांच्यासारखी व्यक्ती धोनी आणि युवराज सिंग यांच्यासारख्या खेळाडूंच्या भवितव्याबाबत कसा निर्णय घेऊ शकते. कारण धोनी आणि युवराज यांनी भारतीय क्रिकेटला फार मोठे योगदान दिले आहे,’’ असे म्हणत एका चाहत्याने धोनी आणि युवराज यांच्या कामगिरीचा उल्लेख करत प्रसाद यांच्यावर प्रहार केला.