बॉक्सिंग हा खूप हिंसक क्रीडाप्रकार मानला जातो. मात्र आपल्या अनोख्या शैलीद्वारे केवळ अमेरिकेत नव्हे तर साऱ्या जगात या खेळाची लोकप्रियता निर्माण करण्यात मोहम्मद अली यांचा मोठा वाटा होता. बॉक्सिंग क्षेत्रासाठी ते सर्वोच्च प्रेरणास्थानी होते. खेळावर ओतप्रोत प्रेम करणारे, निष्ठा ठेवणारे व कायम खिलाडूवृत्तीने खेळणारे मोहम्मद अली हे माझ्या दृष्टीने बॉक्सिंगचा आत्माच होते.
अली यांनी व्यावसायिक बॉक्सिंग क्षेत्र गाजवले तरी अन्य व्यावसायिक खेळाडूंच्या तुलनेत ते खूप वेगळे होते. बहुतांश व्यावसायिक खेळाडूंचा भर ठोशांवर असतो. त्यांच्या खेळात तंत्रशुद्ध खेळाचा फारसा समावेश नसतो. अली मात्र या खेळाडूंपेक्षा खूपच परिपक्व, तंत्रशुद्ध खेळाडू होते. जागतिक स्तरावर बॉक्सिंगमध्ये वर्चस्व गाजवायचे असेल तर केवळ ठोसे मारण्यावर भर देऊन चालत नाही. जर तुमचे पदलालित्य खूप चांगले असेल तर तुमचे ठोसेही आक्रमक व प्रभावी होतात असेच अली हे मानत असत.
बॉक्सिंग या खेळात मी ऑलिम्पिकपर्यंत झेप घेतली व अर्जुन पुरस्कार मिळवला, त्याचे श्रेय अली यांनाही आहे. माझे गुरू मदन शर्मा हे आम्हाला अली यांच्या लढतींचे व्हिडीओ चित्रीकरण दाखवत व त्याप्रमाणे पदलालित्य तसेच चपळाई ठेवण्याबाबत सांगत असत. नकळत आमच्यासाठी अली हेच प्रेरणास्थान झाले होते.
सर्वोत्तम बॉक्सिंग खेळाडूकडे अचूकतेची शैली असते. अली हे कलात्मक व अचूक ठोसे मारण्याबाबत ख्यातनाम होते. त्याचप्रमाणे सातत्याने वेगवान शैली ठेवीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना फारशी संधी द्यायची नाही हे तंत्रही अली यांच्याकडे होते. वेगवान ठोसे मारण्याबरोबरच ते मारताना योग्य वेळ साधणेही महत्त्वाचे असते. या शैलीतही अली हे माहीर होते. फुलपाखरू जसे सतत वेगवेगळ्या शैलीत हालचाली करीत असते, त्याप्रमाणे अली हे िरगमध्ये हालचाल करीत असत. त्यामुळे त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना अली यांच्यावर आक्रमण करताना खूप अडचणी येत असत.
अली यांची आणखी एक शैली म्हणजे रगमध्ये उतरताना त्यांच्याकडे जबरदस्त आत्मविश्वास असे. अनेक जगज्जेते खेळाडूही रिंगमध्ये उतरल्यावर खूप दडपण घेतात. अली मात्र कधीही दडपण घेत नसत. रिंगमध्येही हसतमुख चेहरा ठेवणारे अली यांच्यासारखा खेळाडू मी कधी पाहिलेला नाही. त्यांचा हा हसतमुख चेहरा पाहिल्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूवरच खूप दडपण येत असे. अनेक वेळा बॉक्सिंग खेळताना विनोदी शैलीसह चाहत्यांना आनंद मिळवून देण्याचीही कला त्यांच्याकडे होती.
व्यावसायिक खेळाडूंचा भर आक्रमक शैलीवरच असतो. अली मात्र त्यास अपवाद होते. जेवढा त्यांच्याकडे आक्रमकपणा होता, तेवढीच त्यांची बचावात्मक शैलीही अतिशय उच्च दर्जाची होती. त्यामुळेच त्यांनी जगज्जेतेपदावर हुकूमत गाजवली. व्यायामशाळेत पूरक व्यायाम करणे, हे त्यांना सहसा आवडत नसे. अर्थात काही वेळा नाईलाजास्तव ते व्यायामशाळेत जात असत. प्रत्यक्ष लढतींद्वारे जो अनुभव मिळतो तोच खरा सराव असतो असे ते मानत असत. अडचणींना आत्मविश्वासाने सामोरे जाणे हे अली यांना आवडत असे. कोणतेही अव्वल दर्जाचे यश सहजासहजी मिळत नसते. हे यश मिळविण्यासाठी काटेरी मार्गातून जावेच लागते, अडथळ्यांवर तो खंबीर मनाने सामोरे जातो तोच खरा विजेता असतो हेच अली यांचे तत्त्व असे.
युवा खेळाडूंसाठी ते आदर्श खेळाडू होते. जबरदस्त इच्छाशक्ती, खेळावरची निष्ठा, मनापासून मेहनत करणे ही शिकवण त्यांनी दिली. ते फारसे शिकलेले नव्हते मात्र बॉक्सिंगबरोबरच अन्य खेळाडूंसाठीही ते अतिशय तत्त्वज्ञानी होते. अनेक संकटांवर मात करीत विश्वविजेता कसे व्हायचे, हे त्यांनी सर्वाना शिकवले. अली हे आज आपल्यात नाहीत, मात्र जोपर्यंत बॉक्सिंग हा खेळ राहणार आहे, तोपर्यंत अली हे सर्वाच्या स्मरणात राहणार आहेत. कारण श्रेष्ठ व्यक्ती कधीच मरत नसते.
(शब्दांकन- मिलिंद ढमढेरे)