New Zealand (NZ) vs Pakistan (PAK) 1st ODI: लाहोरमध्ये जन्मलेल्या आणि घरच्यांबरोबर न्यूझीलंडमध्ये स्थायिक झालेल्या मुहम्मद अब्बासने पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केलं. योगायोग म्हणजे पदार्पणाच्या लढतीतच वेगवान अर्धशतकाचा विक्रम अब्बासने नावावर केला. अब्बासने अवघ्या २४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि भारताच्या कृणाल पंड्याचा विक्रम मोडला. कृणालने वनडे पदार्पणात २६ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.

मुहम्मद अब्बास हा पाकिस्तान आणि न्यूझीलंडसाठी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेल्या अझर अब्बास यांचा मुलगा. अझर अब्बास १९९४-९५ ते २००३-०४ या काळात पाकिस्तानमध्ये खेळत होते. यानंतर त्यांनी न्यूझीलंडला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडमधल्या ऑकलंड आणि वेलिंग्टनसाठी ते खेळले. फायरबर्ड्स संघाचे ते प्रशिक्षक आहेत. घरातूनच क्रिकेटचे बाळकडू मिळालेल्या मुहम्मदने ११व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. १४व्या वर्षीच टी२० स्पर्धेत खेळताना त्याने तडाखेबंद खेळी केली होती. टी२० प्रकारात त्याच्या नावावर ७ शतकं आहेत. फोर्ड ट्रॉफी स्पर्धेत ४२.५०च्या सरासरीने ३४० धावा केल्या आहेत. याच कामगिरीची दखल घेत निवडसमितीने मुहम्मदची न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची संघात निवड केली. पहिल्याच लढतीत दमदार अर्धशतकी खेळी करत मुहम्मदने निवडसमितीचा विश्वास सार्थ ठरवला.

पाकिस्तानमधल्या खानेवल जिल्ह्यातलं रोशनपूर हे अब्बास कुटुंबीयांचं मूळ गाव. ‘मुहम्मदचं पदार्पण हा माझ्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. तो एक झुंजार खेळाडू आहे. तो संघासाठी सर्वोत्तम योगदान देईल. पाकिस्तानविरुद्धच तो पदार्पण करतो आहे हा विशेष योगायोग आहे. न्यूझीलंडमधल्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तो सातत्याने चांगली कामगिरी करतो आहे, त्यामुळेच त्याला संधी देण्यात आली आहे. तो या संधीचं सोनं करेल’, असं अझर यांनी सांगितलं.

‘त्याच्या जन्मापासून त्याने क्रिकेटपटू व्हावं असं मला वाटायचं. तो कोणत्या देशासाठी खेळतोय यापेक्षाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू झाला हे महत्त्वाचं आहे’, असं त्यांनी सांगितलं.

पाकिस्तान संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडचे बहुतांश खेळाडू आयपीएल संघांचा भाग असल्याने भारतात आहेत. यामुळे न्यूझीलंडचा नव्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ खेळतो आहे. न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ४-१ अशी सरशी साधली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वसाधारण कामगिरीमुळे पाकिस्तानच्या खेळाडूंवर जोरदार टीका झाली होती. यामुळे या दौऱ्यासाठी पाकिस्तानने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

नेपिअरच्या मॅकलिन पार्क मैदानावर पाकिस्तानने पहिल्या वनडेत नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मार्क चॅपमनने १३ चौकार आणि ६ षटकारांसह १३२ धावांची मॅरेथॉन खेळी केली. पदार्पणवीर मुहम्मद अब्बासने २६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. चॅपमन आणि डॅरेल मिचेल जोडीने चौथ्या विकेटसाठी १७४ चेंडूत १९९ धावांची भागीदारी केली. डॅरेल मिचेलने ७६ धावांची खेळी केली. या तिघांचा अपवाद वगळता न्यूझीलंडच्या बाकी फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानकडून इरफान खानने ३ तर अकिफ जावेद आणि हारिस रौफ यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.