रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे माजी चेअरमन स्टिव्ह बॉलमेअर यांना मागे टाकत मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत क्रीडा संघ मालक ठरले आहेत. फोर्ब्स मासिकाने ही यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयच्या इंडियन प्रिमीअर लिग स्पर्धेत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने मुंबई इंडियन्स या संघाची मालकी स्विकारली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये रिलायन्स उद्योग समुहाला मोठा आर्थिक फायदा झाला होता. ज्यामुळे रिलायन्सचे शेअर्स हे चांगले वाढले होते. फोर्ब्स मासिकाने दिलेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी हे भारतातले पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून जगभरातील श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा 19 वा क्रमांक आहे. अंबानी यांच्या आधी ‘लॉस एंजलिस क्लिपर्स’ या बास्केटबॉल संघाचे मालक स्टिव्ह बॉलमेअर हे आघाडीवर होते, मात्र बॉलमेअर यांना मागे टाकत अंबानी यांना हा मान पटकावला आहे.

2008 साली मुकेश अंबानी यांनी रिलायन्स उद्योग समुहातर्फे 100 मिलीअन डॉलर्सची गुंतवणूक करत मुंबई इंडियन्स संघाची मालकी स्विकारली होती. याव्यतिरीक्त मुकेश अंबानी यांच्या नावावर अनेक जागाही आहेत. मुकेश अंबानी यांचा मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करतो आहे. 2013, 2015 आणि 2017 या 3 हंगामाचं आयपीएलचं विजेतेपद मुंबईने पटकावलं होतं. याव्यतिरीक्त 2011 आणि 2013 सालच्या चॅम्पियन्स लीगचं विजेतेपदही मुंबई इंडियन्सने पटकावलं होतं.