Mukesh Kumar Debut, IND vs WI 2nd Test: आजपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू होत आहे. डॉमिनिका येथे खेळली गेलेली पहिली कसोटी टीम इंडियाने एक डाव आणि १४१ धावांनी जिंकली होती. दुसरी कसोटी पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे खेळवली जात आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार ब्रेथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज मुकेश कुमार भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे शार्दुल ठाकूर भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही, त्यामुळे मुकेश कुमारचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा गोलंदाजही काही कालपासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये चांगली कामगिरी करत आहे. फर्स्ट-क्लास क्रिकेट आणि आयपीएलमध्ये त्याने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. ज्याचा थेट फायदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या खेळाडूला झाला आहे. आता मुकेश कुमार चांगली कामगिरी करून सर्वांची मने जिंकतील अशी अपेक्षा सर्वांना असेल.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीनंतर मुकेश पदार्पण करणार असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “शार्दुल ठाकूर तंदुरुस्त नाही त्यामुळे मुकेश कुमार पदार्पण करणार आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप मेहनत घेतली आहे.” भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मुकेशचे ट्विट करून अभिनंदन केले. मुकेशचा फोटो शेअर करण्यासोबतच बोर्डाने कॅप्शन लिहिलं आहे की, “मुकेश कुमार यांचे अभिनंदन. तो टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.”

मुकेश हा उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. मुकेशने ७० प्रथम श्रेणी डावात १४९ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान ४० धावांत ६ विकेट्स घेणे ही त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने ६ वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. मुकेशने २४ लिस्ट ए सामन्यात २६ विकेट्स घेतल्या आहेत. त्‍याने टी२० मॅचमध्‍ये ३२ विकेट्सही घेतल्या आहेत. मुकेशला आयपीएलच्या शेवटच्या मोसमात खेळण्याची संधी मिळाली. तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. मुकेशने आयपीएल २०२३च्या १० सामन्यात ७ विकेट्स घेतल्या. यादरम्यान ३० धावा देऊन २ विकेट्स घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

कोण आहेत मुकेश कुमारचे वडील?

भारताने ऑक्टोबर २०२२मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बिहारमधील एका छोट्या गावातून आलेल्या मुकेश कुमारलाची निवड करण्यात आली होती. २८ वर्षीय मुकेश कुमार बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याच्या वेगवान गोलंदाजीने क्रिकेटच्या दिग्गजांना प्रभावित केले आणि आता मुकेश कुमार भारताकडून खेळणार आहे. मुकेशची काय कथा आहे. गावातील मुलाने टीम इंडियाचा प्रवास कसा ठरवला? जाणून घ्या.

हेही वाचा: IND vs PAK: “…तर आम्ही टीम इंडियाला कुठेही हरवू शकतो”, माजी पाकिस्तानी खेळाडूने भारताला दिले आव्हान

मुकेश कुमार हा बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील काकरकुंड या छोट्याशा गावचा रहिवासी आहे. तो गरीब कुटुंबातून येतो. त्याला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. तो गावातील गल्ल्या आणि शेतात क्रिकेट खेळत असे. त्यामुळे त्याला घरातील लोकांकडून खूप बोलणी खावी लागत होती. त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास त्याचे वडील सतत सांगायचे. यासाठी त्याचा काका त्याला खूप बोलत असे. कारण घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.

मुलाने शिकून चांगली नोकरी करावी अशी आई-वडिलांची इच्छा होती. घरचा खर्च भागवण्यासाठी वडील कोलकात्यात टॅक्सी चालवत असत. २०११मध्ये मुकेशला त्याच्या वडिलांनी कोलकाता येथे बोलावले होते. मुलाने सैन्यात भरती व्हावे, असे वडिलांचे स्वप्न होते. मुकेशने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या परीक्षेलाही तीन वेळा हजेरी लावली होती. पण मेडिकलमध्ये नापास झाला. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जेव्हा त्याची निवड झाली तेव्हा त्याच्या निवडीवर त्याची आई मालती देवी म्हणाली की, “माझा मुलगा देशासाठी खेळेल. त्याच्या यशाचा मला अभिमान आहे.” त्याचवेळी त्याच्या काकांनाही पश्चाताप होत होता की, लहानपणी त्यांनी मुकेशला क्रिकेट खेळण्यासाठी मारले. त्यांची क्षमता त्यांना समजू शकली नाही. त्यांना मुकेशचा अभिमान आहे. तो देशासाठी खेळेल.

हेही वाचा: Virat Kohli: “मी कृतज्ञ आहे…”, ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी विराट कोहली झाला भावुक; पाहा Video

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

भारत: यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिज: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), तागेनारायण चंद्रपॉल, किर्क मॅकेन्झी, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानेज, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॅरिकन, शॅनन गॅब्रिएल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh kumar made his debut for the indian cricket team in test cricket avw