INDA vs AUSA Match Updates: भारतीय अ संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. ज्यामध्ये रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मॅके येथे ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध २ सामन्यांच्या अनधिकृत कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ बहुतांशी यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाच्या बाजूने असताना टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाच्या खेळात दमदार पुनरागमन केले आणि त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वेगवान गोलंदाज मुकेश कुमारची भेदक गोलंदाजी.

मुकेश कुमारने ऑस्ट्रेलिया अ संघाचा पहिला डाव १९५ धावांत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे त्यांना पहिल्या डावात फारशी आघाडी घेता आली नाही. पहिल्या दिवसाच्या खेळात भारतीय अ संघ पहिल्या डावात १०७ धावांवरच सर्वबाद झाला होता. पण दुसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलिया अ संघाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. याचे मोठे श्रेय मुकेश कुमारच्या गोलंदाजीला जाते, ज्याने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – WTC Points Table: दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने WTC च्या गुणतालिकेत बदल, न्यूझीलंड संघाला बसला फटका तर टीम इंडिया टेन्शनमध्ये

ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या या सामन्यात भारतीय अ संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आला, परंतु संपूर्ण संघ केवळ १०७ धावांत सर्वबाद झाला. यानंतर भारतीय गोलंदाजांनीही यजमान संघाचा पहिला डाव झटपट गुंडाळण्यात कोणतीही कसर सोडली नाही.यामध्ये सर्वात मोठी भूमिका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला वेगवान गोलंदाज मुकेश कुमारची होती, ज्याने १८.४ षटके टाकली आणि केवळ ४६ धावा दिल्या आणि ऑस्ट्रेलियन संघाच्या ६ खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

मुकेश व्यतिरिक्त, ऑस्ट्रेलिया विरुद्ध २२ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या संघाचा भाग असलेल्या प्रसिध कृष्णाला देखील ३ विकेट घेण्यात यश आले, तर नितीश रेड्डीने एक विकेट घेतली.

हेही वाचा – Rohit Sharma: “मी निवृत्ती घेतल्यानंतर या क्रमांकावर…”, रोहित शर्माने सूर्या-हार्दिकपेक्षा कमी रिटेंशन किंमत मिळाल्यानंतर केले मोठे वक्तव्य, पाहा VIDEO

टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया अ संघाला पहिल्या डावात ८८ धावांची आघाडी घेता आली. दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या सलामीच्या फलंदाजांकडून चांगली सुरुवात अपेक्षित होती. पण पहिल्या डावात गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये परतलेला कर्णधार ऋतुराज गायकवाड दुसऱ्या डावातही अवघ्या ५ धावा करून बाद झाला. याशिवाय अभिमन्यू इसवरन १२धावा करून धावबाद झाला. ४० षटकांत भारताने २ बाद १३३ धावा करत ४५ धावांची आघाडी मिळवली आहे. साई सुदर्शन अर्धशतक झळकावत ५८ धावा करून मैदानावर आहे. तर त्याच्या जोडीला देवदत्त पड्डीकल ४६ धावा करत मैदानावर आहे.