MUM vs BAR Baroda beat Mumbai by 84 runs : रणजी करंडक एलिट २०२-२५ या स्पर्धेतील गट अ सामन्यात मुंबई आणि बडोद्याचा संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात बडोद्याने मोठी उलथापालथ करत ४२ रणजी चॅम्पियन असलेल्या मुंबई संघाचा ८४ धावांनी दारुण पराभव केला आहे. या सामन्यात बडोद्याने पहिल्या डावात २९० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ २१४ धावांच करु शकला. यानंतर ७६ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात बडोद्याने १८५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा ११७ धावां गारद झाला. अशा प्रकारे बलाढ्य मुंबई संघाविरुद्ध बडोद्याने दणदणीत विजय नोंदवला. भार्गव भट्टने १० विकेट्स घेत बडोद्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
तिसऱ्या दिवशी पृथ्वी शॉ आणि हार्दिक तमोरच्या विकेट्स गमावल्यानंतर मुंबईने २ बाद ४२ धावा केल्या होत्या. यानंतर भार्गव भट्टने अजिंक्य रहाणे आणि आयुष म्हात्रे यांच्या महत्त्वपूर्ण विकेट घेत धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईला अडचणीत आणले. भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेला श्रेयस अय्यर, सिद्धेश लाडसह मुंबईचा डाव पुन्हा रुळावर आणण्यात यशस्वी ठरला. भट्टने गतविजेत्याला पुन्हा एकदा अडचणीत आणण्यापूर्वी या दोघांनी ४१ धावांची भर घातली. यानंतर श्रेयस अय्यर ३० धावा काढून फिरकीपटूचा बळी ठरला.
त्यानंतर भट्टने अनुभवी शम्स मुलाणी आणि शार्दुल ठाकूर यांच्या विकेट्स घेत मुंबईच्या डावाला खिंडार पाडली. मात्र, दुसरीकडे लाडने चमकदार कामगिरी करणे सुरूच ठेवले आणि अखेरीस सामना निकराच्या लढतीकडे वळला. मुंबईच्या या फलंदाजाने ९४ चेंडूत ५९ धावा करत गतविजेत्या संघाला विजयाच्या वाटेवर नेऊन ठेवले. चौथ्या दिवशी सकाळचे सत्र निकालाच्या आशेने वाढविण्यात आले. मात्र, तनुष कोटियन आणि मोहित अवस्थी प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्याने लाडला दुसऱ्या टोकाकडून कोणतीही साथ मिळाली नाही. यानंतर भट्टने सामन्यातील शेवटची विकेट लाडच्या रूपात घेत बडोद्याच्या शानदार विजयावर शिक्कामोर्तब केला.