इक्बाल, शार्दूलची झुंजार खेळी  मध्य प्रदेशचा पराभव

दोन दिवसांत ३० बळींची नोंद झालेल्या खेळपट्टीवर चौथ्या डावात २८० धावांचे आव्हानात्मक लक्ष्य पेलत मुंबई रणजी क्रिकेट स्पर्धेत मध्य प्रदेशविरुद्धच्या लढतीत तीन विकेट्सनी थरारक विजय मिळवला. या विजयासह मुंबईने बाद फेरीत वाटचाल केली.
तिसऱ्या दिवशी आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने पहिल्याच षटकात दमदार फॉर्मात असणाऱ्या अखिल हेरवाडकरला गमावले. त्यानंतर जय बिस्त आणि श्रेयस अय्यर जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. मिहीर हिरवणीने अय्यरला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ३६ धावा केल्या. सूर्यकुमार यादवही याही लढतीत मोठी खेळी करू शकला नाही. १८ धावा करून तो जलाज सक्सेनाच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिल्याच हंगामात छाप उमटवणाऱ्या जय बिस्ताला सक्सेनाने माघारी धाडले. त्याने ७ चौकार आणि २ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली. यंदाच्या हंगामात फॉर्मसाठी झगडणाऱ्या आदित्य तरेने सिद्धेश लाडच्या साथीने धावफलक हलता ठेवला. अंकित शर्माने सिद्धेशला बाद केले. सिद्धेश बाद झाल्यावर तरेला अब्दुलाची साथ मिळाली. अर्धशतकाकडे कूच करणाऱ्या तरेला बाद करत सक्सेनाने मुंबईला धक्का दिला. त्याने ४५ धावा केल्या. तरेपाठोपाठ निखिल पाटीलही तंबूत परतल्याने मुंबईची अवस्था ७ बाद २१५ अशी झाली. मात्र इक्बाल अब्दुला आणि शार्दूल ठाकूर यांनी सगळा अनुभव पणाला लावत आठव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अब्दुलाने १०१ चेंडूंत ३ चौकारांसह ३९ धावांची, तर शार्दूलने ५० चेंडूंत ३ चौकारांसह ३८ धावांची खेळी केली. सहा गुणांची कमाई करतानाच मुंबईने बाद फेरीत प्रवेश केला.
मध्य प्रदेशने पहिल्या डावात २४० धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईचा पहिला डाव १६२ धावांत आटोपल्याने मध्य प्रदेशला ७८ धावांची निर्णायक आघाडी मिळाली. मुंबईच्या भेदक गोलंदाजीमुळे मध्य प्रदेशला दुसऱ्या डावात २०१ धावाच करता आल्या. मात्र तरीही मुंबईसमोर २८० धावांचे कठीण लक्ष्य होते.

संक्षिप्त धावफलक
मध्य प्रदेश : २४० आणि २०१ पराभूत विरुद्ध मुंबई : १६२ आणि ७ बाद २८३ (जय बिस्त ७४, आदित्य तरे ४५, इक्बाल अब्दुला ३९, शार्दूल ठाकूर ३८, जलाज सक्सेना ४/८९)
सामनावीर : जय बिस्त

Story img Loader