अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा अनुभव गाठीशी असणारा राकेश कुमारसारखा खेळाडू संघात आल्यामुळे स्वाभाविकपणे यू मुंबाची ताकद वाढली आहे, असे मत यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमारने व्यक्त केले. पहिल्या दोन हंगामांमध्ये पाटणा पायरेट्सचे प्रतिनिधित्व करणारा राकेश प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या हंगामात यू मुंबाकडून खेळणार आहे.
तिसऱ्या हंगामात मुंबईच्या घरच्या मैदानाऐवजी विशाखापट्टणम्ला प्रो कबड्डीला प्रारंभ होत आहे. याबाबत अनुप कुमार म्हणाला, ‘‘मुंबईत जर सुरुवात झाली असती, तर आमच्यासाठी खूप बरे झाले असते. कारण एनएससीआय स्टेडियमवर यू मुंबाला चांगले पाठबळ मिळत आले आहे. परंतु तिसऱ्या हंगामात मुंबईत फक्त चारच दिवस सामने आहेत. बाद फेरी राजधानीत खेळायची आहे. विजयी घोडदौड कायम राखण्याचा निर्धार जरी यू मुंबाने केला असला, तरी युवा खेळाडूंनाही अधूनमधून संधी देणार आहोत.’’
पहिल्या हंगामाचे उपविजेते आणि दुसऱ्या हंगामाचे विजेते अशी रुबाबदार कामगिरी यू मुंबाची झाली आहे. तिसऱ्या हंगामाविषयी अनुप म्हणाला, ‘‘मागील दोन हंगामात आम्ही यू मुंबाचे वर्चस्व सिद्ध केले आहे. या वर्षीसुद्धा आम्हीच जिंकू, अशा आत्मविश्वासाने आमची तयारी सुरू आहे.’’
‘‘प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सरावाकडे पूर्णत: लक्ष केंद्रित केले आहे. या सरावात तंदुरुस्ती आणि बचावावर आम्ही विशेष भर दिला आहे. कोणताही खेळाडू मैदानात उतरेल, तेव्हा तो तंदुरुस्त जरूर असायला हवा,’’ असे अनुपने सांगितले.
तिसऱ्या हंगामात अनेक संघांत बदल झाले आहेत, त्याचा कोणता प्रभाव स्पध्रेवर पाहायला मिळेल, या प्रश्नाला उत्तर देताना अनुप म्हणाला, ‘‘अनेक संघांतील खेळाडू बदलल्यामुळे सामन्यागणिक या संघांच्या सांघिक ताकदीचा पूर्ण अंदाज येऊ शकेल. पण बऱ्याचशा खेळाडूंसोबत विविध स्तरावर खेळल्यामुळे त्यांचा खेळ पुरेसा माहीत आहे. पण बरीचशी रणनीती ही सामन्यातील परिस्थितीनुसार आखावी लागते.’’

Story img Loader