वानखेडे स्टेडियमवर आज किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामना

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सॅम करन याने अष्टपैलू खेळी साकारत मुंबई इंडियन्सचा पराभव करून किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मालकीण प्रीटी झिंटा हिच्यासह मोहालीच्या स्टेडियमवर भांगडा नृत्य केले होते. आता याच पराभवाचा वचपा काढण्याची संधी मुंबईला घरच्या मैदानावर मिळणार आहे. बुधवारी वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात मुंबईचा संघ विजयी सातत्य कायम राखण्यासाठी उत्सुक आहे.

दोन्ही संघांमध्ये मोहालीत झालेली लढत किंग्ज इलेव्हन पंजाबने आठ गडी राखून जिंकली होती. मात्र वानखेडे स्टेडियमवरील परिस्थिती मुंबईच्या बाजूने असल्यामुळे या सामन्यात यजमानांचे पारडे जड मानले जात आहे. आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि गेल्या वर्षीच्या उपविजेत्या सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवल्यामुळे मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास उंचावला आहे. गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावरच मुंबईला हे विजय साकारता आले आहेत.

मुंबईच्या फलंदाजीत अफाट क्षमता असली तरी त्यांच्या एकाही फलंदाजाला या मोसमात अव्वल २० फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवता आले नाही. मुंबईची फलंदाजी काहीसी डळमळीत होत असताना गोलंदाज मात्र आपल्यावरील जबाबदारी नेटाने पार पाडत आहेत. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याने सनरायजर्सविरुद्ध अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत १२ धावांमध्ये ६ बळी मिळवले होते. आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला होता.

जोसेफसह मुंबईकडे जसप्रीत बुमरा, जेसन बेहरेनडॉर्फ ही वेगवान गोलंदाजांची सर्वोत्तम फळी उपलब्ध आहे. त्यांना हार्दिक पंडय़ाचीही चांगली साथ लाभत आहे. रोहित शर्माने अद्याप दणकेबाज खेळी साकारली नसली तरी पुढील सामन्यांमध्ये मात्र कर्णधाराकडून मोठी खेळी मुंबईला अपेक्षित आहे. सलामीवीर क्विंटन डी’कॉक हासुद्धा आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करू शकलेला नाही. सूर्यकुमार यादवला मात्र आपला खेळ उंचवावा लागणार आहे.

अखेरच्या क्षणी युवराज सिंग, किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पंडय़ा हे उपयुक्त योगदान देत असले तरी आघाडीच्या फळीने कामगिरीत सुधारणा करण्याची गरज मुंबईला भासत आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबने चार विजय मिळवून आठ गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांनी अप्रतिम फलंदाजी केल्यामुळे पंजाबने सोमवारी सनरायजर्सवर विजय मिळवला होता. मात्र ख्रिस गेलचे अपयश पंजाबला भोवत आहे. गोलंदाजीत कर्णधार रविचंद्रन अश्विन उपयुक्त गोलंदाजी करत असून त्याला सॅम करन, मोहम्मद शमी आणि मुरुगन अश्विन यांची चांगली साथ लाभत आहे.

* सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि सिलेक्ट १

संघ

मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी’कॉक, सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, मिचेल मॅकक्लेनाघन, जेसन बेहरेनडॉर्फ, मयांक मरकडे, राहुल चहर, जसप्रीत बुमरा, अल्झारी जोसेफ, अनमोलप्रीत सिंग, सिद्धेश लाड, अंकुल रॉय, एविन लुइस, पंकज जयस्वाल, बेन कटिंग, इशान किशन, आदित्य तरे, रसिख सलाम, बरिंदर सरन, जयंत यादव.

किंग्ज इलेव्हन पंजाब

रविचंद्रन अश्विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, मयांक अगरवाल, सर्फराझ खान, डेव्हिड मिलर, मनदीप सिंग, सॅम करन, अँड्रय़ू टाय, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, मुजीब उर रेहमान, करुण नायर, मोझेस हेन्रिक्स, वरुण चक्रवर्ती, हरप्रीत ब्रार, सिमरन सिंग, निकोलस पूरन, हार्डस विलोजेन, अंकित राजपूत, अर्शदीप सिंग, दर्शन नलकांडे, अग्निवेश अयाची.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai against kings xi punjab in wankhede stadium today