झारखंडसारख्या तळाच्या संघाने मागील सामन्यात दिलेली टक्कर गतविजेत्या मुंबईला खडबडून जाग आणेल का, या प्रश्नाचे उत्तर शनिवारपासून सुरू होणाऱ्या ओडिशाविरुद्धच्या ‘अ’ गटातील रणजी सामन्यातून मिळणार आहे. पाच सामन्यांतून १० गुणांची कमाई करीत मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर ओडिशाच्या खात्यावरही पाच सामन्यांतून १० गुण जमा आहेत. त्यामुळे मुंबई या सामन्यात प्रभाव दाखवून आपले उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित करील, अशी आशा आहे.
झहीर खान, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेले आहेत, तर दुखापतींमुळे काही खेळाडू बेजार झाले आहेत. आता अभिषेक नायरच्या दुखापतीची यात भर पडली आहे. त्यामुळे मुंबईची चिंता वाढली आहे. वानखेडे स्टेडियमवरील मागील सामन्यात मुंबईने जेमतेम पराभव वाचवून लढत अनिर्णीत राखली होती.
‘‘मागील सामन्याने आम्हाला खडबडून जाग आणली आहे. पहिल्या दिवशी आमची स्थिती समाधानकारक होती. परंतु सौरभ तिवारीच्या खेळीमुळे या सामन्याचे चित्र पालटले. एखाद्या खेळाडूने ३५० धावसंख्येपैकी २३८ धावा केल्या असतील, तर त्याला निश्चितपणे श्रेय द्यायला हवे. आता आम्हाला सावरायला हवे आणि आगामी लढतीत विजय साकारायला हवा,’’ अशी प्रतिक्रिया मुंबईचा कर्णधार वसिम जाफरने व्यक्त केली. ‘‘बाद फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी या सामन्यात चांगले गुण मिळवण्याचा आमचा प्रयत्न असेल,’’ असे तो पुढे म्हणाला.
मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मुंबईच्या फलंदाजीची प्रामुख्याने मदार असेले ती जाफर (३६० धावा) आणि यष्टिरक्षक आदित्य तरे (५०९ धावा) याच्यावर. परंतु कौस्तुभ पवार आणि सुशांत मराठे यांच्या कामगिरीबाबत मुंबई समाधानी नाही.
‘‘कौस्तुभची कामगिरी चांगली झाली नाही म्हणून त्याला वगळण्यात आले होते. सुशांतला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही, तर सिद्धेश लाड आपला पहिलाच हंगाम खेळत आहे. मुंबईच्या फलंदाजीची भिस्त युवा फलंदाजांवर आहे, परंतु ते सर्व जण गुणी आहेत. हे सारे जुळून येण्यासाठी फक्त एका यशस्वी डावाची आवश्यकता आहे, जेणेकरून आमचा आत्मविश्वास परत मिळू शकेल,’’ असे जाफरने सांगितले.
मुंबईकडून डावखुरा फिरकी गोलंदाज विशाल दाभोळकरने सर्वाधिक २६ बळी घेतले आहेत. याचप्रमाणे ४२ वर्षीय लेग स्पिनर प्रवीण तांबेला कारकिर्दीतील प्रथम श्रेणी पदार्पण करण्याची संधी या सामन्यातून मिळू शकेल. याविषयी जाफर म्हणाला, ‘‘ओडिशाविरुद्धच्या सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडू अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत, परंतु तांबेची निवड होण्याची दाट शक्यता आहे. वैविध्यपूर्ण अशी लेग स्पिन गोलंदाजी आणि फलंदाजी ही या अनुभवी खेळाडूची वैशिष्टय़े आहेत.’’
मुंबईच्या गोलंदाजीविषयी कर्णधार जाफर म्हणाला की, ‘‘विशाल दाभोळकरने या हंगामात चांगली गोलंदाजी केली आहे. या एकमेव फिरकी गोलंदाजाची कामगिरी लक्षणीय झाली आहे. वेगवान गोलंदाज जावेद खान आणि शार्दूल ठाकूर यांनी कठीण काळात जबाबदारीने कामगिरी बजावली आहे.’’
झारखंडप्रमाणे कामगिरी करून लढत अनिर्णीत राखण्याचे मनसुबे ओडिशाने आखले आहेत. कर्णधार बिप्लाब समंत्रे (२९९ धावा), अभिलाश मल्लिक (३४४ धावा), नटराज बेहेरा (१९५ धावा), निरंजन बेहेरा (२८८ धावा) यांच्यावर ओडिशाच्या फलंदाजीची जबाबदारी असेल.