वेस्ट इंडिजच्या आगामी भारत दौऱ्यात बीसीसीआयने महत्वपूर्ण बदल केले आहेत. ६ डिसेंबरपासून विंडीजच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे, ज्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळतील. मुंबईच्या वानखेडे मैदानावर पहिला सामना ६ डिसेंबररोजी रंगणार होता. मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्ताने लाखो अनुयायी मुंबईत येत असतात, त्यामुळे या दिवशी सामन्याला पोलिस बंदोबस्त पुरवण्यात मुंबई पोलिसांनी असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या पहिल्या सामन्याचा मान आता हैदराबादला देण्यात येणार आहे.
त्यामुळे ६ डिसेंबरला दोन्ही संघ हैदराबादच्या मैदानावर समोरासमोर येतील. यानंतर ११ डिसेंबरला दोन्ही संघ आपला अखेरचा टी-२० सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळतील. मालिकेतला दुसरा सामना ८ डिसेंबरला तिरुअनंतपुरम येथे खेळवण्यात येईल. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांनी बीसीसीआयच्या विनंतीला होकार कळवल्यानंतर या दौऱ्यात बदल जाहीर करण्यात आला आहे.