कुमार राज्य कबड्डी स्पर्धा

परभणीतील सेलू येथे सुरू असलेल्या कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, जळगाव, यजमान परभणी यांनी कुमार तर कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, अहमदनगर यांनी कुमारी गटात विजयी सलामी दिली.

मुलांच्या ड-गटात पालघरने धुळ्यावर ४१-९ अशी सहज मात केली. पालघरच्या विजयात राहुल सावर चमकला. ब-गटात पुण्याने साताऱ्याला ४५-२५ असे पराभूत करीत आगेकूच केली.

मुलींच्या फ-गटात मुंबई उपनगरने औरंगाबादचा ४४-१२असा धुव्वा उडवला.  ब-गटात साताऱ्याने नाशिकचा ४६-३१ असा पाडाव केला. क-गटात रत्नागिरीने बीडवर ३९-१० असा विजय मिळवला.

मुलांच्या फ-गटात मुंबई शहरने लातूरला ५४-२२ असे नमवले.मुंबईने ठाण्याला ३२-३२ असे बरोबरीत रोखले. या दोन्ही सामन्यांत मुंबईच्या पंकज मोहितेचा अष्टपैलू खेळ, त्याला अवधूत शिंदेंची चढाईची, तर अमित मानेची पकडीची साथ महत्त्वाची ठरली. ठाण्याच्या परेश हांडे, अस्लम इनामदार यांनी चमकदार खेळ केला.

किशोर राज्य  खो-खो स्पर्धा

जळगावच्या छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या किशोर-किशोरी (१४ वर्षांखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत किशोर गटात मुंबई शहरचे आव्हान शनिवारी संपुष्टात आले. मात्र याच गटात मुंबई उपनगर, सोलापूर, औरंगाबाद उस्मानाबाद यांनी तर किशोरींमध्ये पुणे व नाशिक संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

किशोर विभागात गतविजेत्या सोलापूरने रत्नाागिरीवर १२-६ अशी ६ गुण व १ डाव राखून मात केली. विजयी संघाच्या गणेश बोरकर आणि अजय कश्यप व राजू कोळी यांनी चमकदार खेळ केला. पुण्याने मुंबईवर १८-७ अशी १ डाव व ११ गुणांनी मात केली. पुण्याच्या विवेक ब्राह्मणेने (३.३० मि. व ६ गडी) अष्टपैलू खेळ केला. त्याला विनायक शिंगाडेने सुरेख साथ दिली. मुंबई उपनगरने परभणीचा १६-८ असा १ डाव व ८ गुणांनी पराभव केला. मुंबई उपनगरच्या सचिन पटेलने ३.२० मि. संरक्षण केले.

Story img Loader