घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करत ठाणे संघाने राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत गुरुवारी सर्वाचे लक्ष वेधले. प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा मिळालेल्या पुरुष गटाच्या रोमहर्षक लढतीत ठाण्याने कोल्हापूरवर १२-११ अशी निसटती मात केली. ठाण्यातील विकास कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत यजमान ठाण्यासह मुंबई शहर, मुंबई उपनगर यांनी बाद फेरीत आगेकूच केली. जितेश जोशी, प्रशांत चव्हाण आणि गिरीश इर्नाक यांच्या शानदार खेळाच्या जोरावर ठाण्याने हा विजय मिळवत बाद फेरीत आगेकूच केली. याआधीच्या लढतीत ठाण्याने लातूरचा ४४-२८ असा पराभव केला. याचप्रमाणे मुंबई शहरने साताऱ्यावर ३६-२५ असा विजय मिळवला. मुंबईच्या विजयात सागर कुऱ्हाडे, प्रदर्शन किरवे चमकले.
महिला गटात बलाढय़ मुंबई शहरने औरंगाबादचा ५९-१४ असा धुव्वा उडवला. रेखा सावंत आणि विनिता पवार विजयाच्या शिल्पकार ठरल्या. याचप्रमाणे मुंबई उपनगरने अहमदनगरवर ६७-१० अशी आरामात मात केली. मीनल जाधव, राजश्री पवार यांनी शानदार खेळाचे प्रदर्शन केले. पुण्याने रायगडवर ५२-१४ असा दणदणीत विजय मिळवला. पुण्याकडून स्नेहल शिंदे, दीपिका जोसेफ यांनी दिमाखदार खेळ केला. ठाणे संघाला उपनगरविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र बुधवारी अहमदनगरवरच्या एकतर्फी विजयाच्या जोरावर ठाण्याने बाद फेरी गाठली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा