सिंताशू कोटक हे नाव घेतलं की रणजी स्पर्धेतील जवळपास सर्वच संघांना धास्ती वाटते. कारण नांगरधारी फलंदाज म्हणून कोटक प्रसिद्ध असून आपल्या भक्कम बचावाच्या जोरावर त्याने बऱ्याचदा प्रतिस्पध्र्याना हैराण करून सोडले आहे. मुंबई आणि सौराष्ट्र हे दोन्ही संघ रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले असून मुंबईलाच विजेपदाची संधी असल्याचे कोटकने म्हटले आहे.
मुंबईचा संघ बलाढय़ आहे आणि सचिन तेंडुलकरही अंतिम सामना खेळणार असल्याने त्यांचेच पारडे जड आहे. मुंबईच्या संघात अजित आगरकर, वासिम जाफर, धवल कुलकर्णी आणि अभिषेक नायरसारखे दर्जेदार खेळाडू आहेत, असे कोटक म्हणाला.
मुंबईच्या माजी रणजीपटूंना सन्मानिका
मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यामध्ये रणजी स्पर्धेचा अंतिम सामना वानखेडेवर खेळवण्यात येणार आहे. मुंबई ४० व्या विजेतेपदाच्या उंबरठय़ावर असून मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए)माजी खेळाडूंना सन्मानिकेची भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मुंबईच्या माजी रणजीपटूंबरोबर आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मोफत सन्मानिका देण्याचे क्रिकेट मंडळाने ठरवले आहे’, अशी माहिती एमसीएचे उपाध्यक्ष विनोद देशपांडे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा