तुषार आणि श्रेयसची चमकदार कामगिरी

वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेची भेदक गोलंदाजी आणि श्रेयस अय्यरची नाबाद अर्धशतकी खेळी या बळावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या अव्वल साखळीत दिल्लीवर आठ गडी राखून विजय मिळवला. पहिल्या सामन्यात कर्नाटककडून पराभव पत्करणाऱ्या मुंबईने स्पध्रेतील पहिला विजय नोंदवत चार गुणांची कमाई केली.

मुंबईने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली. दिल्लीने निर्धारित २० षटकांत ७ बाद १४४ धावा केल्या. दिल्लीकडून उन्मुक्त चंद (२२) आणि ध्रुव शौरी (३३) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ५८ धावांची भागीदारी केली. मग ललित यादव (३३) आणि हिंमत सिंग (२४) यांनी पाचव्या गडय़ासाठी ५६ धावांची भागीदारी केली. मुंबईच्या तुषारने चार षटकांत १९ धावांत चार फलंदाजांना बाद केल्यामुळे दिल्लीच्या धावसंख्येपुढे अंकुश ठेवता आला.

त्यानंतर, मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ (३) याने निराशा केली, परंतु जय बिस्ता (३९) आणि श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ५७ धावांची भागीदारी रचली. मग श्रेयसने सूर्यकुमार यादव (२६ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ४२) सोबत तिसऱ्या गडय़ासाठी नाबाद ७६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. श्रेयसने ४७ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५३ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

  • दिल्ली : २० षटकांत ७ बाद १४४ (ध्रुव शौरी ३३, ललित यादव ३३; तुषार देशपांडे ४/१९) पराभूत वि. मुंबई : १९ षटकांत २ बाद १४८ (श्रेयस अय्यर नाबाद ५३, सूर्यकुमार यादव नाबाद ४२; नितीश राणा १/७)
  • गुण : मुंबई ४, दिल्ली ०