Ranji Trophy 2024-25 Mumbai Beat Haryana: रणजी ट्रॉफीमधील चॅम्पियन संघ मुंबईने रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघाने उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाचा १५३ धावांनी पराभव केला. मुंबईच्या संपूर्ण संघाने या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत दणदणीत विजय मिळवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर मुंबई वि. हरियाणामध्ये उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने अजिंक्य रहाणेच्या शतकाच्या जोरावर दणदणीत विजय मिळवला आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच ११ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रहाणे ८८ धावांवर खेळत होता आणि त्यानंतर चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच त्याने आपले शतक पूर्ण केले.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईने ३१५ धावा केल्या. पहिल्या डावात मुंबईची सुरूवातीची फळी फेल ठरली. तर तनुष कोटियन आणि शम्स मुलानी यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर मुंबईने ३०० धावांचा पल्ला पार केला. तनुषने १३ चौकारांसह ९७ धावा तर शम्स मुलानीने १० चौकारांसह ९१ धावांची खेळी केली. शिवाय कर्णधार अजिंक्य रहाणे ३१ धावा करत बाद झाला.

प्रत्युत्तरात हरियाणाच्या संघाने ३११ धावा केल्या. हरियाणाचा कर्णधार अंकित कुमार याने १६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्याला शम्स मुलानीने बाद केले. पण शार्दुल ठाकूरच्या भेदक गोलंदाजीपुढे हरियाणाचा निम्मा संघ तंबूत परतला. शार्दुलने १८.५ षटकांत ५८ धावा देत ६ विकेट्स घेतले. तर शम्स मुलानी आणि तनुष कोटियनने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतले.

१४ धावांची आघाडी घेत मुंबईच्या संघाने दुसऱ्या डावात फारशी चांगली सुरूवात केली नाही आणि ५० धावांत २ विकेट्स गमावले. यानंतर अजिंक्य रहाणेने सूर्यकुमार यादवच्या मदतीने संघाचा डाव उचलून धरला. तर गेल्या सामन्याचा शतकवीर सिद्धेश लाड ४३ धावांची शानदार खेळी करत बाद झाला. गेल्या काही आंतरराष्ट्रीय सामन्यात फ्लॉप ठरलेल्या सूर्यकुमार यादवला सूर गवसला आणि त्याने ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७० धावांची वादळी खेळी केली.

सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने शिवम दुबेबरोबर भागीदारी रचली आणि आपले ४१वे प्रथम श्रेणी शतकही झळकावले. रहाणेने १३ चौकारांच्या मदतीने १८ धावांची खेळी केली. तर शिवम दुबे १ षटकार आणि ६ चौकारांसह ४८ धावा करून बाद झाला. यानंतर हरियाणाने कमबॅक करत मुंबईला ३३९ धावांवर सर्वबाद केले. तेव्हा मुंबईकडे ३५४ धावांची आघाडी होती.

रणजी ट्रॉफी (फोटो-एक्स)

विजयाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हरियाणाचा सलामीवीर लक्ष्यने ६४ तर सुमित कुमारने ६२ धावांची खेळी केली. याशिवाय सर्व फलंदाजी रॉयस्टन डायस आणि शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीपुढे बाद झाले. शार्दुल ठाकूरने दुसऱ्या डावात १० षटकांत २६ धावा देत ३ विकेट घेतले आणि ३ मेडन षटकं टाकली. तर रॉयस्टन डायसने १०.३ शटकांत ३९ धावा देत ५ विकेट्स घेतले. तर तनुष कोटियनने २ विकेटेस घेतल्या.

आता मुंबईचा उपांत्य फेरीत कोणाशी सामना होणार आहे. हे अद्याप ठरलेले नाही. याशिवाय गुजरात वि. सौराष्ट्र यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळवला गेला, या सामन्यात गुजरात क्रिकेट संघाने एक डाव आणि ९८ धावांनी मोठा विजय नोंदवला. तर विदर्भ आणि तमिळनाडू यांच्यातील सामन्यात विदर्भने १९८ धावांनी विजय मिळवला आहे. तर चौथा सामना जम्मू काश्मीर आणि केरळ यांच्यात सुरू आहे. ज्यामध्ये केरळला विजयासाठी ९८ षटकांमध्ये२९९ धावांची गरज आहे आणि संघाने १०० धावांत २ विकेट्स गमावले आहेत.