यू मुंबाने पुणेरी पलटणविरुद्धची आपली विजयाची परंपरा कायम राखताना सहाव्यांदा विजय मिळवला. यजमान यू मुंबाने पुण्याला ३०-२७ अशा फरकाने हरवून स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगमध्ये सलग आठव्या विजयाची नोंद केली.
पूर्वार्धात दोन्ही संघांमध्ये १२-१२ अशी बरोबरी झाली होती. मात्र दुसऱ्या सत्रात सामन्यातील उत्कंठा अधिक वाढली. २२व्या मिनिटाला पुण्याने यू मुंबावर पहिला लोण चढवला, मात्र त्यानंतर घरच्या मैदानावर पराभूत न होण्याच्या इष्रेने यू मुंबाने दिमाखात खेळ उंचावला. उत्तरार्धात यू मुंबाच्या चढाईपटूंच्या पाच वेळा ‘सुपर टॅकल’ झाल्या. परंतु तरी यू मुंबाने हिमतीने सामना जिंकला. यू मुंबाकडून अनुप कुमारने तीन बोनस गुणांसहित सर्वाधिक ८ गुण मिळवले. राकेश कुमारने ७ गुण मिळवले. पुण्याकडून दीपक निवास हुडा आणि जसमेर सिंग गुलिया यांनी प्रत्येकी सहा गुण मिळवले. एका सामन्याची बंदी असल्यामुळे मनजीत चिल्लर या सामन्यात खेळू शकला नाही. त्याची उणीव पुण्याला तीव्रतेने जाणवली. मात्र उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुण्याला अखेरचा सामना जिंकावा लागणार आहे.
आजचे सामने
* बंगाल वि. बंगळुरू
* यू मुंबा वि. तेलुगू टायटन्स
* सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३ व एचडी २, ३.