फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत मुंबई इंडियन्सच्या फिरकी गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांची दाणादाण उडविली. त्यामुळेच सोमवारी आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सला २५ धावांनी विजय मिळविता आला. प्रवीण तांबे, अजिंक्य रहाणे आणि स्टीव्हन स्मिथ या महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय राजस्थानला चांगलाच धोकादायक ठरला.
आयपीएलमध्ये चमक दाखवणाऱ्या फिरकी गोलंदाज तांबेला विश्रांती देण्याचा राजस्थानचा निर्णय किती चुकीचा आहे, याचाच प्रत्यय घडवत मुंबईच्या फलंदाजांनी मनमुरादपणे फलंदाजी केली. मुंबईने २० षटकांत उभी केलेली ३ बाद १७८ धावसंख्या राजस्थानसाठी खूपच आव्हानात्मक ठरली. या लक्ष्याचा पाठलाग करताना एकवेळ त्यांची ७ बाद ७५ अशी स्थिती होती. त्या वेळी त्यांचा डाव शंभरीत गुंडाळला जाणार अशी शक्यता निर्माण झाली होती, मात्र ब्रॅड हॉज व जेम्स फॉल्कनर यांच्या शैलीदार भागीदारीमुळेच राजस्थानला निर्धारित २० षटकांत ८ बाद १५३ धावांपर्यंत पोहोचता आले.
मायकेल हसी व लेंडल सिमन्स यांनी आक्रमक खेळ करीत १४.३ षटकांत १२० धावांची भागीदारी करीत मुंबईच्या डावाचा पाया रचला. हसी याने ३९ चेंडूंत ५६ धावा करताना तीन चौकार व दोन षटकार अशी फटकेबाजी केली. सिमन्सने ५१ चेंडूंत पाच चौकार व दोन षटकारांसह ६२ धावा केल्या. मुंबईला पावणेदोनशे धावांपलीकडे नेण्यात कर्णधार रोहित शर्मा याचा मोठा वाटा होता. त्याने १९ चेंडूंत तीन चौकार व चार षटकारांसह ४० धावा केल्या. त्याने किरॉन पोलार्ड (नाबाद १४) याच्या साथीने केवळ पाच षटकांमध्ये ५६ धावांची कमाई केली. राजस्थानकडून अंकित शर्मा याने दोन बळी घेतले.
मुंबईच्या प्रभावी फिरकी माऱ्यापुढे राजस्थानच्या फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली. त्यांनी पहिले सहा फलंदाज केवळ ६९ धावांमध्ये गमावले. एका बाजूने करुण नायरने धडाकेबाज खेळ करीत चार चौकार व तीन षटकारांसह ४८ धावा केल्या. तो बाद झाला त्या वेळी राजस्थानची ७ बाद ७५ अशी स्थिती होती. हॉज व फॉल्कनर यांनी ६.५ षटकांत ६९ धावा करीत खेळात रंगत आणली. हॉजने तीन षटकारांसह ४० धावा केल्या. फॉल्कनरने एक चौकार व दोन षटकारांसह नाबाद ३१ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ३ बाद १७८ (मायकेल हसी ५६, लेंडल सिमन्स ६२, रोहित शर्मा ४०; अंकित शर्मा २/२३) विजयी वि. राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ८ बाद १५३ (करुण नायर ४८, ब्रॅड हॉज ४०, जेम्स फॉल्कनर नाबाद ३१; हरभजन सिंग २/१३, श्रेयस गोपाळ २/२५)
सामनावीर : माइक हसी.

Story img Loader