सोलापूर येथे सुरू असलेल्या सुवर्णमहोत्सवी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत पुरुषांमध्ये मुंबई शहरने तर महिलांमध्ये मुंबई उपनगरने अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबई शहरचा मुकाबला सांगलीशी आणि उपनगरची लढत साताराविरुद्ध होणार आहे. महिला गटाच्या लढतीत मुंबई उपनगरने संयमी खेळाच्या जोरावर ठाण्यावर मात केली. कीर्ती चव्हाण, शिल्पा जाधव, सोनिया मिठबावकर यांचा अनुभव या लघुत्तम आक्रमणापर्यंत लांबलेल्या सामन्यात उजवा ठरला. शेवटच्या आक्रमणात ठाण्याला विजयासाठी ६ गुणांची आवश्यकता होती. परंतु त्यांना ५ गडी बाद करता आल्याने सामना बरोबरीत सुटला. ही कोंडी फोडण्यासाठी अलाहिदा डाव खेळवण्यात आला. हा डावही बरोबरीत सुटला. अखेर लघुत्तम आक्रमणाद्वारे निर्णय होऊन मुंबई उपनगरने थरारक विजय मिळवला.
दुसऱ्या लढतीत साताऱ्याने उस्मानाबादवर एकतर्फी लढतीत ११-७ अशी ४ गुणांनी विजय मिळवला. साताऱ्यातर्फे प्रियांका येळेने ३.३० आणि ३.५० मिनिटे संरक्षण केले. प्राजक्ता कुचेकर आणि करिश्मा नागरजी यांनी प्रत्येकी ४ गडी बाद करत आक्रमणाची आघाडी सांभाळली.
पुरुषांमध्ये मुंबई शहरने उत्कंठावर्धक लढतीत मुंबई उपनगरचा १ गुण आणि १ मिनिट राखून पराभव केला. मुंबई शहरतर्फे तेजस शिरसकर, विराज कोठमकर, मनोज वैद्य यांनी शानदार खेळ केला. दुसऱ्या लढतीत सांगलीने ठाण्याचे आव्हान २ गुण आणि ७.२० मिनिटे राखून संपुष्टात आणले. सांगलीतर्फे नरेश सावंत, रमेश सावंत, मिलिंद चावरेकर हे या विजयाचे शिल्पकार ठरले.

Story img Loader