मुंबईचा संघ म्हणजे खडूस, जिंकण्यासाठी जिवाचे रान करणारा, अशी काही वर्षांपूर्वी ओळख होती खरी, पण ही ओळक आता लुप्त होतेय की काय, अशी भीती मुंबईकर व्यक्त करत आहेत. कारण या मोसमातील कामगिरीवर नजर टाकली तर मुंबईचा संघ विजयासाठी जास्त प्रयत्न करताना दिसला नाही. या मोसमात मुंबईला फक्त एकच विजय मिळवता आला तर काही सामन्यांमध्ये विजय दृष्टिक्षेपात असताना मुंबईने पहिल्या डावाच्या आघाडीवर ३ गुण मिळवण्यात धन्यता मानली. सध्या वानखेडेवर सुरू असलेल्या बडोद्याविरुद्धच्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यातही मुंबईकडून नेमके हेच पाहायला मिळाले. बडोद्याचा पहिला डाव २७१ धावांवर आटोपल्यावर मुंबईकडे ३७४ धावांची आघाडी होती, त्यामुळे त्यांच्यावर फॉलोऑन लादून विजयाच्या दिशेने कूच करण्याची मुंबईकडे नामी संधी होती. पण मंगळवारीच मुंबईचा कर्णधार अजित आगरकर याने फॉलोऑन न लादण्याचे सूतोवाच केले होते. मंगळवारी मुंबईच्या संघाने ६४ षटके टाकली होती, त्या वेळी गोलंदाज थकल्याचे आगरकर म्हणत होता. दोन दिवसांमध्ये १०२.२ षटके टाकून मुंबईचे गोलंदाज थकणार असतील तर नक्कीच संघाची पुढची वाट बिकट असेल. बुधवारी बडोद्याचा डाव २७१ धावांत आटोपला, अंबाती रायुडूने एकाकी झुंज दिली, पण तो फॉलोऑन वाचवू शकला नाही. मुंबईने फॉलोऑन न लादण्याचा निर्णय घेत फलंदाजी केली आणि कौस्तुभ पवार आणि हिकेन शाह यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर दिवसअखेर १ बाद १७१ अशी मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण ५४५ धावांची आघाडी आहे.
बडोद्याने चौथ्या दिवसाची सावध सुरुवात केली, पण पदार्पण करणाऱ्या विशाल दाभोळकरने पिनल शाहला (११) बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. अंबाती रायुडूला या वेळी ३३ धावांवर असताना विशालच्या गोलंदाजीवर कर्णधार आगरकरने जीवदान दिले आणि त्याचा फायदा त्याने उचलला. रायुडूने या वेळी १५ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ८९ धावांची खेळी साकारली, पण अन्य फलंदाजांची साथ न मिळाल्याने त्यांचा डाव २७१ धावांवर संपुष्टात आला.
पहिल्या डावात ३७४ धावांची आघाडी घेत मुंबईने तीन गुणांची कमाई करत उपान्त्य फेरीत पोहोचण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले खरे, पण बडोद्याला फॉलोऑन न लादण्याचा निर्णय बऱ्याच जणांना पटला नाही. मुंबईच्या दुसऱ्या डावाची वसिम जाफर (३३) आणि कौस्तुभ पवार यांनी चांगली सुरुवात केली. रायुडूने जाफरला पायचीत पकडत मुंबईला पहिला धक्का दिला आणि तोच धक्का मुंबईसाठी अखेरचा ठरला. त्यानंतर कौस्तुभ आणि सुदैवी हिकेन शाह यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२३ धावांची अभेद्य भागीदारी रचल्यामुळे मुंबईला दिवसअखेर १ बाद १७१ अशी मजल मारता आली. कौस्तुभने १०४ व्या चेंडूवर चौकार ठोकत अर्धशतक झळकावले, त्याने ६ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद ७० धावा फटकावल्या आहेत. हिकेनला या वेळी १७ आणि ५४ धावांवर जीवदान मिळाले, त्याने ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ६५ धावा फटकावल्या. मुंबईचा संघ गुरुवारी पहिल्या सत्रापर्यंत डाव घोषित करण्याची चिन्हे नाहीत, कारण सचिन तेंडुलकरला फलंदाजीचा सराव करण्याची ही चांगली संधी असेल. त्यामुळे मुंबईचा संघ जिंकण्यापेक्षा तीन गुणांच्या जोरावर उपांत्य फेरीत जाण्यात धन्यता मानणार आहे.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ६४५ (डाव घोषित) ; (दुसरा डाव) ५१ षटकांत १ बाद १७१ (कौस्तुभ पवार खेळत आहे ७०, हिकेन शाह खेळत आहे ६५; अंबाती रायुडू ३२/१)
बडोदा (पहिला डाव) : १०२.२ षटकांत सर्व बाद २७१
(अंबाती रायुडू नाबाद ८९; विशाल दाभोळकर ८८/३).

Story img Loader