मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) बहुचर्चित त्रवार्षिक निवडणूक गुरुवारी होणार असून अध्यक्षपदासाठी शरद पवार-आशीष शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे आणि मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

अध्यक्षपदासोबत कार्यकारी मंडळाच्या जागांसाठीही थेट लढत असल्याने निवडणूक आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र येऊन पवार-शेलार गटातून ही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ‘एमसीए’ निवडणुकीबाबत बरीच चर्चा रंगली आहे. सहसचिवपदासाठी दीपक पाटील यांच्याविरुद्ध कोणीही उमेदवारी अर्ज केलेला नसल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. सचिवपदासाठी अजिंक्य नाईक, ‘एमसीए’चे माजी अध्यक्ष रवी सावंत यांचे पुत्र नील सावंत आणि मयांक खांडवाला अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.

कोषाध्यक्षपदासाठी जगदीश आचरेकर, संजीव खानोलकर आणि अरमान मल्लिक असे तीन उमेदवार आहेत. कार्यकारी परिषदेच्या जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरही दावेदार आहेत.

दरम्यान, ‘एमसीए’ निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांसह ‘बीसीसीआय’चे नवनिर्वाचित कोषाध्यक्ष आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलारही उपस्थित होते.