प्रभावशाली व्यक्तींमुळे मुंबई क्रिकेटची वाताहत
मुंबईच्या क्रिकेटची कीर्ती जगात सर्वत्र पोहोचलेली. कारण मुंबईने आतापर्यंत बरेच क्रिकेटपटू भारताला दिले आहेत. त्याचबरोबर मुंबईचे क्रिकेट एवढे स्पर्धात्मक आहे की, इथे प्रत्येक खेळाडू शाळा, महाविद्यालय, क्लब्ज ते थेट रणजी स्पर्धापर्यंत खेळत असताना प्रचंड अनुभव मिळतो. मग या वर्षी मुंबईच्या क्रिकेटची प्रभावशाली व्यक्तींमुळे वाताहत झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे इथे कुंपणच शेत खात आहे, अशी वस्तुस्थिती आहे. कुंपण म्हणजे नेमके कोण? तर मुंबईच्या क्रिकेटमधील प्रभावशाली व्यक्ती.
विविध गटातील निवड समिती आणि प्रशिक्षक नेमण्याची जबाबदारी क्रिकेट सुधारणा समितीकडे आहे. पण मग सुधारणा समितीमधील अजित आगरकर हे रणजी आणि २३ वर्षांखालील निवड समितीचे अध्यक्ष कसे होऊ शकतात? ते समालोचनही करतात. हा तर परस्पर हितसंबंध जपण्याचा प्रयत्नच केला गेल्याचे थेट दिसत आहे. सुधारणा समितीच्या या निर्णयाला कार्यकारिणी समितीनेही हिरवा कंदील दाखवला होता. एकीकडे लोढा समितीमुळे बीसीसीआयमधील काही मंडळींना परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, तर आगरकर यांच्यावर अशी मेहेरबानी का? त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा की याच समितीमध्ये रणजीपटू सुनील मोरे आहेत. हे मोरे जवळपास २० वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यानंतर गेल्या २० वर्षांमध्ये त्यांचे क्रिकेटला भरीव असे योगदान नाही किंवा अन्य वयोगटांच्या निवड समितीमध्येही त्यांचे नाव नव्हते, मग ते थेट रणजीच्या निवड समितीमध्ये आले कसे? ते काही आंतरराष्ट्रीय खेळाडू नक्कीच नाहीत, मग त्यांच्यासाठी या पायघडय़ा का घातल्या गेल्या?
रणजी आणि २३ वर्षांखालील समितीबरोबर १६ आणि १९ वर्षांखालील निवड समितीमध्येही काही गोष्टी खटकणाऱ्या आहेत. १६-वर्षांखालील निवड समितीचे अध्यक्ष अतुल रानडे यांचा आणि त्याच समितीमधील अन्य सदस्यांचा अनुभव यांच्यामध्ये किती फरक आहे, हेदेखील पाहायला हवे. त्याचबरोबर १९ वर्षांखालील निवड समितीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला अविष्कार साळवी आणि राजू सुतार यांच्यापेक्षा राजेश पवार यांना अनुभव कमी असला तरी त्यांना निवड समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. यापूर्वी अशा गोष्टी घडलेल्या आहेत, पण ज्या व्यक्तींना अनुभव कमी असताना अध्यक्षपद दिले त्यांनी तशी कामगिरी करून दाखवली. आतापर्यंत मुंबईच्या विविध स्तरावरील प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तींवर अन्याय का होत आहे, याबाबत चर्चा होत आहे.
संघाचा प्रशिक्षक निवडताना कर्णधाराचे मतही ध्यानात घेतले जाते. अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ संपत असताना आणि नवीन प्रशिक्षक निवडताना कर्णधार विराट कोहलीला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले होते. जेव्हा रणजी संघाचा प्रशिक्षक निवडण्याची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा मुंबईच्या कर्णधाराला सुधारणा समितीने किती महत्त्व दिले, त्याचा मान त्यावेळी ठेवला गेला का?
काही रणजी प्रशिक्षकांना समितीने तडकाफडकी काढले, काहींना मोसम संपल्यावर रामराम करायला लावला, मग तो न्याय आता का नाही? चंद्रकांत पंडित यांनी सांगितलेले मानधन समितीला जास्त वाटले, त्यांचा मान ठेवला गेला नाही. विदर्भाने त्यांच्यासाठी पायघडय़ा घातल्या आणि निकाल तुमच्यापुढे आहे. जर रणजी प्रशिक्षकांना तुम्ही असा नियम लावता तर तुमच्या अकादमीमधील प्रशिक्षकांना हाच न्याय लावला जातो का? हे एकदा तपासून पाहायला हवे. फलंदाजांची किंवा गोलंदाजांची कामगिरी वाईट झाली तर त्या प्रशिक्षकांवर तुम्ही आतापर्यंत कोणती कारवाई केली हेदेखील तुम्हाला सांगता येणार नाही. अकादमीतील प्रशिक्षक, अन्य विविध गटांतील प्रशिक्षक यांच्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनने लाखोंनी पैसे उधळले त्याचे फलित काय?
विविध गटांतील संघांसाठी एमसीएने मार्गदर्शक निवडले. त्यांना किती अधिकार देण्यात आले? एखाद्या प्रशिक्षकाने चांगले निकाल दिले, खेळाडू घडवले असले तरी द्वितीय व तृतीय स्तरीय प्रशिक्षकांना काम नाही म्हणून चांगल्या व्यक्तींवर अन्याय केल्याचे क्रिकेटवर्तुळात म्हटले जात आहे. या गोष्टींची उत्तरे मिळत नाहीत.
सध्याच्या घडीला मुंबई क्रिकेटमधील प्रभावशाली व्यक्तींच्या प्रभावामुळे हे सारे होत आहे. या प्रभावशाली व्यक्तीं मुंबईचे क्रिकेट खराब करण्याचा अधिकार कोणी दिला, याबाबत क्रिकेट क्षेत्रात चर्चा आहे. खेळाडूची गुणवत्ता पाहायची असते, त्याची जात-पात, क्लब, तो कुणाचा कोण आहे, हे पाहायचे नसते. हे जेव्हा मुंबईचे क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल तेव्हाच कामगिरी सुधारेल, अन्यथा मुंबईचे क्रिकेट एक आख्यायिका बनून राहील.