मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर ज्या मातीत लहानाचा मोठा झाला, ज्या पंढरीतून त्याने क्रिकेटला सुरुवात केली आणि क्रिकेट विश्वाचा विठ्ठल झाला ती मुंबई सचिनच्या निवृत्तीच्या निर्णयाने नि:शब्द झाली, हळहळली. मुंबईकरांना सचिनच्या या निर्णयाने जोरदार धक्का बसला असून सचिन यापुढे मैदानात दिसणार नाही, हा विचारच त्यांच्या पचनी पडत नाही.
सचिनच्या निवृत्तीबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष रवी सावंत म्हणाले की, ‘‘सचिनच्या निर्णयाने आम्हा साऱ्यांनाच जबरदस्त धक्का बसला आहे. मी माझ्या निवृत्तीबाबतचा निर्णय स्वत: घेईन, असे त्याने सांगितले होते. त्याप्रमाणे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतलेला असला तरी तो पचनी पडत नाही. सचिनचा दोनशेवा कसोटी सामना आयोजित करण्याची संधी कोणतीही असोसिएशन सोडणार नाही, पण सचिननेच अखेरचा सामना मुंबईत व्हावा, हे सांगितल्यावर आमच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल. सचिन जेव्हा दोनशेवा कसोटी सामना खेळायला मैदानात उतरेल, तेव्हा उदासीनतेचे वातावरण असेल, कारण सचिन त्यानंतर मैदानात दिसणार नाही ही कल्पनाच करवत नाही. सचिनची दुबईमधली ऑस्ट्रेलियाविरुद्धची वादळी खेळी माझ्यासाठी अविस्मरणीय अशीच आहे.’’
सचिनने पहिल्या रणजी सामन्यात गुजरातविरुद्ध खेळताना शतक झळकावले, त्यावेळी पॅड लावून पॅव्हेलियनमध्ये बसलेले आणि सध्याचे मुंबईचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी सचिनच्या निवृत्तीबाबत म्हणाले की, ‘‘याबाबत काय बोलणार, शब्दच सुचत नाही, नि:शब्द व्हायला झाले आहे. मला गुंडप्पा विश्वनाथ आवडायचे, पण त्यांची संपूर्ण कारकीर्द पाहता आली नाही. पण सचिनच्या ५० हजार धावा मला बघता आल्या आहेत, याचे मला समाधान आहे. त्याचे गेल्या २४ वर्षांपासूनचे क्रिकेट मी पाहत आलो आहे. रणजी पदार्पणाच्या सामन्यात सचिनने शतक झळकावले तेव्हा मी पॅव्हेलियनमध्ये पॅड लावून बसलेलो होतो. पहिल्या सामन्यापासून आम्ही एकत्र खेळलो. २०० कसोटी सामने खेळणे ही एक मोठी गोष्ट आहे, त्याची महान कारकीर्द मला पाहता आली, याचे समाधान आहे. त्याची सर्व स्वप्नं साकार झाली असल्याने तो समाधानाने निवृत्त होत आहे. मला एका गोष्टीची उत्सुकता आहे की, सचिन गेली २४ वर्षे आंतरराष्ट्रीय स्तराचे क्रिकेट खेळत आला, पण निवृत्ती स्वीकारल्याच्या दुसऱ्या दिवशी तो नक्की काय करेल, कारण क्रिकेट हेच त्याचे सर्वस्व होते.’’
सचिनच्या निवृत्तीबाबत त्याचा शाळेपासून ते मुंबई रणजी संघापर्यंतचा मित्र अमोल मुझुमदार म्हणाला की, ‘‘सचिनचा हा निर्णय योग्य असून आपण साऱ्यांनीच या निर्णयाचा आदर करायला हवा. कारकिर्दीत एकूण ५० हजार धावा, ५३च्या सरासरीने १८ हजार कसोटी धावा, ५१ कसोटी शतके, अशी सचिनची कारकीर्द आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मी त्याला पाहत आलो आहे. एका महान क्रिकेटपटूबरोबर खेळता आले, हा मी माझा सन्मान समजतो. त्याची ब्रेबॉर्नवरील ऑस्ट्रेलियाविरुद्धची खेळी मी कधीच विसरू शकत नाही. मुंबई व ऑस्ट्रेलिया असा तो सामना होता व सचिनने त्यामध्ये द्विशतक झळकावले होते. त्यावेळी त्याच्यासमोर मीच उभा होतो, अशी खेळी मी कुठेच आजतागायत पाहिलेली नाही. याबाबत मी स्वत:ला भाग्यवान समजतो.’’
मुंबईचे क्रिकेट हळहळले!
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर ज्या मातीत लहानाचा मोठा झाला, ज्या पंढरीतून त्याने क्रिकेटला सुरुवात केली आणि क्रिकेट विश्वाचा विठ्ठल झाला ती मुंबई सचिनच्या निवृत्तीच्या निर्णयाने नि:शब्द झाली, हळहळली.
![मुंबईचे क्रिकेट हळहळले!](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/10/sptrr1.jpg?w=1024)
First published on: 11-10-2013 at 12:06 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai cricket miss sachin tendulkar