रणजी करंडकातील उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी आठ संघ आपापसात भिडलेले आहेत. चारही सामने ६ जून ते १० जून या कालाधीत बेंगळुरूमध्ये खेळवले जात आहेत. मुंबई आणि उत्तराखंड यांच्यात दुसरा उपांत्यपूर्व सामना खेळवला जात आहे. या सामन्यातील दुसरा दिवस मुंबईच्या फलंदाजांच्या नावावर राहिला. मुंबईच्या २१ वर्षीय सुवेद पारकरने पदार्पणातच शानदार खेळ करत द्विशतक झळकावले.
रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पदार्पण करणाऱ्या सुवेदने १२३ चेंडूत आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर २०६ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने त्याने आपले प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक पूर्ण केले. पण, सुवेद इथेच थांबला नाही तर ३७५ चेंडूंचा सामना करून आपले पहिले द्विशतक साजरे केले.
बाद फेरीत पदार्पण करताना द्विशतक झळकावणारा सुवेद रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी १९९४ मध्ये अमोल मुजुमदारने हरियाणाविरुद्ध द्विशतक झळकावून इतिहास रचला होता. विशेष म्हणजे अमोल मुजुमदार सध्या मुंबईच्या संघाचे प्रशिक्षक आहेत. दुखापतग्रस्त अजिंक्य रहाणेच्या जागी त्याला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने या संधीचे सोने करत पहिल्याच सामन्यात इतिहास रचला.
मुंबईचा संघ आता अतिशय मजबूत स्थितीत पोहोचला आहे. मुंबईने पहिल्या डावात ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. मुंबईला ही धावसंख्या पार करण्यात सर्फराज खान आणि सुवेद पारकर यांनी मदत केली. सर्फराजने १४० चेंडूंत धडाकेबाज शतक ठोकले आहे. त्याच्या या शतकी खेळीमध्ये ११ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. तो या रणजी हंगामामध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. सरफराजने आतापर्यंत ६०० हून अधिक धावा केल्या आहेत.