मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनला (एमडीएफए) नव्याने निवडणूका घेण्याचे आदेश सहाय्यक धर्मादाय आयोगाने दिले आहेत. सहाय्यक धर्मादाय आयुक्त आर. व्ही. भक्त यांनी नव्याने निवडणूका घेण्याचे आणि सात दिवसांच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम आखण्याचे आदेश दिले. या निवडणुकीसाठी निरीक्षक नेमण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.
असोसिएशनमधील काही अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करत असल्यामुळे एमडीएफएच्या चार पदाधिकाऱ्यांनी धर्मादाय आयोगाकडे धाव घेतली होती. या पदाधिकाऱ्यांमध्ये एमडीएफएचे सहसचिव एव्हरेस्ट गोन्सालविस आणि झेवियर फारिया तसेच कार्यकारी समितीतील सदस्य जेम्स डिकोस्टा आणि शशांक शाह यांचा समावेश होता. ‘‘अर्जदारांचे म्हणणे ऐकल्यानंतर असोसिएशनमधील कारभार पारदर्शकपणे व्हावा, यासाठीच नव्याने निवडणूका घेण्याचे आदेश देण्यात आले. असोसिएशनचे कामकाज सुरळीतपणे होण्यासाठी असे आदेश देण्याचा अधिकार धर्मादाय आयोगाला आहे,’’ असे भक्त यांनी सुनावणीदरम्यान सांगितले.
याबाबत प्रतिक्रिया देताना शशांक शाह म्हणाले, ‘‘एमडीएफएच्या कार्यकारी समितीची चार वर्षांची मुदत ६ मार्च २०१३ रोजी संपली. या कालावधीत कार्यकारी समितीने अनेक वेळा नियमांमध्ये आणि घटनेत सोयीस्करपणे बदल केले. स्वत:ची खाजगी मालमत्ता असल्याप्रमाणे ते एमडीएफएचा कारभार चालवत आहेत. विद्यमान कार्यकारिणी निवडणूका घेण्यासाठी टाळाटाळ करत होती. खेळ आणि खेळाडूंचे नुकसान होऊ नये, यासाठीच आम्ही आयोगाकडे धाव घेतली. यापूर्वीही धर्मादाय आयोगाने असोसिएशनमधील गलथान कारभाराबद्दल ६ जून २०१३ रोजी एमडीएफएला नोटिस पाठवली होती.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा