बंगळूरु : देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईपुढे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात उत्तर प्रदेशचे आव्हान असेल. 

बंगळूरु येथे होणाऱ्या या पाचदिवसीय सामन्यात मुंबईचे लयीत असलेले फलंदाज विरुद्ध उत्तर प्रदेशचे प्रतिभावान गोलंदाज यांच्यातील द्वंद्व पाहण्यासारखे असेल. ४१ वेळा रणजी करंडक विजेत्या मुंबईने उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंडला तब्बल ७२५ धावांनी धूळ चारली. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशने कर्नाटकला पाच गडी राखून पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.

मुंबईच्या फलंदाजीची भिस्त डावखुरा यशस्वी जैस्वाल आणि सर्फराज खान यांच्यावर आहे. या दोघांनीही गेल्या सामन्यात शतके झळकावली. त्यांना कर्णधार पृथ्वी शॉची साथ लाभेल. तसेच सुवेद पारकरने पदार्पणात द्विशतक झळकावण्याची किमया साधली. मुंबईचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज आदित्य तरे दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. गोलंदाजीत डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानी आणि वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी हे महत्त्वाची भूमिका बजावतील.

दुसरीकडे, कर्णधार करण शर्मा, प्रियम गर्ग आणि रिंकू सिंह हे प्रतिभावान फलंदाज उत्तर प्रदेशच्या संघात आहेत. गोलंदाजीत मोहसीन खानच्या समावेशामुळे उत्तर प्रदेश संघाला बळकटी मिळाली असून त्याला यश दयाल, अंकित राजपूत आणि सौरभ कुमार यांची साथ लाभेल.

’ वेळ : सकाळी ९.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, २ एचडी

Story img Loader