गतविजेत्या मुंबईने यंदाच्या मोसमाची आंतराष्ट्रीय खेळाडूंच्या साथीने झोकात सुरुवात करणाऱ्या मुंबईला बाद फेरीत पोहोचण्यासाठी नाकी नऊ आल्याचेच चित्र आहे. गुजरातविरुद्धच्या अंतिम साखळी सामन्यात मुंबईला विजय आवश्यक असून त्यांनी विजय मिळवला नाही तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान धोक्यात येण्याची शक्यता आहे.
‘अ’ गटामध्ये कर्नाटक ३२ गुणांनिशी बाद फेरीत पोहोचला आहे. तर गुजरातचा संघ २६ गुणांनिशी दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई आणि पंजाब यांचे समान २३ गुण असून त्यांच्यामध्ये जो संघ अव्वल कामगिरी करेल तो बाद फेरीत जाण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पंजाबने सामना जिंकल्यास दोन्ही संघ बाद फेरीत जातील आणि गुजरात स्पर्धेतून बाहेर पडेल. पण मुंबई आणि पंजाब दोघांनी पहिल्या डावात आघाडी घेतली तर मुंबई बाद फेरीत पोहोचेल आणि पंजाबचे आव्हान संपुष्टात येईल. पण पंजाबपुढे झारखंडचे आव्हान असून ते हा सामना जिंकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पंजाबने सामना जिंकला आणि मुंबईला फक्त पहिल्या डावात आघाडी मिळवता आली तर मुंबईचे आव्हान संपुष्टात येईल.
गेल्या काही सामन्यांमध्ये कर्णधार वसिम जाफर आणि आदित्य तरे यांच्या बॅटने मौन पाळल्याचे चित्र आहे. मुंबईला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर या दोघांपैकी एकााने मोठी खेळी साकारायला हवी. हिकेन शाह आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. दिल्ली आणि कर्नाटकविरुद्धच्या सामन्यांमध्ये दमदार खेळी साकारणारा सिद्धेश लाड जायबंदी झाल्याने मुंबईसाठी हा एक धक्का असेल. गोलंदाजीमध्ये जावेद खान चांगली कामगिरी करत असला तरी त्याला अन्य गोलंदाजांची अपेक्षित साथ मिळताना दिसत नाही.
घरच्या मैदानात सामना असल्याने गुजरातच्या संघावर जास्त दडपण नसेल. कर्णधार पार्थिव पटेल आणि वेणुगोपाल राव यांच्यावर फलंदाजीची मदार असेल. तर गोलंदाजीची धुरा वेगवान गोलंदाज अक्षर पटेल आणि फिरकीपटू राकेश ध्रुव यांच्यावर असेल.

Story img Loader