आतापर्यंत भारतीय हॉकी संघटनेचे सदस्यत्व असलेल्या मुंबई हॉकी असोसिएशनने हॉकी इंडियाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यामुळे मुंबई हॉकी असोसिएशनचा कारभार आता हॉकी इंडियाच्या अधिपत्याखाली चालणार आहे.
या घडामोडींमुळे मुंबई हॉकी असोसिएशनला भविष्यात हॉकी इंडियाच्या अधिपत्याखाली रंगणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे. आता हॉकी इंडियाकडे सहा संलग्न सदस्य आणि ३० अधिकृत सदस्य तसेच राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे आणखी दोन सदस्य असतील. हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बात्रा म्हणाले, ‘‘हॉकीच्या विस्तारासाठी आणि प्रचारासाठी मुंबई हे महत्त्वाचे केंद्र आहे. मुंबईने आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडू भारताला दिले आहेत. त्यामुळे मुंबई हॉकी असोसिएशनसह हॉकीचा प्रसार करताना मजा येणार आहे. तळागाळातील खेळाडूंमध्ये आणि ग्रामीण भागात हॉकी हा खेळ पोहोचवण्यात मुंबई हॉकी असोसिएशन सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त स्पर्धा आयोजित करेल, अशी आशा आहे.’’
मुंबई हॉकी असोसिएशननेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुंबई हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष मंघासिंग बक्षी यांनी खेळाच्या विस्तारासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

Story img Loader