खेळ आणि खेळाडूंचे हित जपण्याची आवई उठवणाऱ्या मुंबई हॉकी असोसिएशनने (एमएचए) गुरुवारी आडमुठी भूमिका घेत खेळाडूंवरच अन्याय करण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रकरण आपल्याच अंगाशी येईल, असे लक्षात आल्यानंतर मुंबई हॉकी असोसिएशनने नमते घेतले आहे.
मुंबई हॉकी असोसिएशनने अलीकडेच हॉकी इंडियाचे सहसदस्यत्व पत्करल्याने भारतीय हॉकी महासंघाने मुंबई हॉकी असोसिएशनची मान्यता रद्द केली. भारतीय हॉकी महासंघातर्फे (आयएचएफ) बंगळुरू येथे मार्च महिन्याअखेरीस होणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या तयारीसाठी मुंबईच्या खेळाडूंनी एमएचएच्या महिंद्रा स्टेडियमवर सराव करण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली होती. स्टेडियमचा ताबा सध्या राज्य सरकारकडे असल्याने क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभागाचे उपसंचालक एन. बी. मोटे यांनी एमएचएला पत्र लिहून सरावासाठी हे स्टेडियम खुले करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी सकाळी मुंबई संघातील जवळपास ६० खेळाडू महिंद्रा स्टेडियमवर पोहोचले असता स्टेडियमला टाळे ठोकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तुम्हाला सराव करून देऊ नका, असे आदेश एमएचएच्या कार्यकारिणीने दिल्याचे स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनी खेळाडूंना सांगितले. त्यामुळे राज्य सरकारकडून परवानगी मिळूनसुद्धा खेळाडूंना स्टेडियमबाहेरच सराव करावा लागला.
याबाबत मुंबई हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष मंघासिंग बक्षी यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘एमएचएच्या कार्यकारिणीने हा निर्णय घेतला होता. याबाबत माझे एन. बी. मोटे यांच्याशी बोलणे झाले आहे. पण आता आम्ही आमची चूक सुधारत असून शुक्रवारपासून खेळाडूंना महिंद्रा स्टेडियमवर सराव करता येईल. मुंबई संघातील खेळाडूंची यादी आम्ही मागवली होती. ती न मिळाल्यामुळेच आम्ही खेळाडूंना सराव करण्यावाचून रोखले.’’
मुंबई हॉकी असोसिएशनची आडमुठी भूमिका
खेळ आणि खेळाडूंचे हित जपण्याची आवई उठवणाऱ्या मुंबई हॉकी असोसिएशनने (एमएचए) गुरुवारी आडमुठी भूमिका घेत खेळाडूंवरच अन्याय करण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रकरण आपल्याच अंगाशी येईल, असे लक्षात आल्यानंतर मुंबई हॉकी असोसिएशनने नमते घेतले आहे.
First published on: 15-03-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai hockey association refusing players from practising at its ground