आघाडीच्या फळीला अपयश आल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई संघाला तळाच्या फलंदाजांनी सावरले. शम्स मुलानी (९१ धावा) आणि तनुष कोटियन (नाबाद ८५) यांच्या शानदार खेळींमुळे गतविजेत्या मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारपासून सुरू झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतील हरियाणाविरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवसअखेर ८ बाद २७८ धावांची मजल मारली.

कोलकाता येथे सुरू झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईने निम्मा संघ ६५ धावांत गमावला होता. त्यानंतर थोड्या प्रतिकारानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे (३१) आणि शार्दूल ठाकूर (१५) हेसुद्धा माघारी परतल्याने मुंबईची ७ बाद ११३ अशी स्थिती झाली. या आव्हानात्मक परिस्थितीत मुलानी आणि कोटियन यांनी आठव्या गड्यासाठी १६५ धावांची अप्रतिम भागीदारी रचत मुंबईला भक्कम स्थितीत पोहोचवले.

मुलानीची सलग दुसऱ्या शतकाची संधी थोडक्यात हुकली. १७८ चेंडूंत १० चौकारांसह ९१ धावा केल्यानंतर मुलानीचा अडसर अनुभवी फिरकीपटू जयंत यादवने दूर केला. दिवसअखेर कोटियनच्या साथीने मोहित अवस्थी (नाबाद ०) खेळपट्टीवर होता. भारतीय कसोटी संघात रविचंद्रन अश्विनचा वारसदार म्हणून पाहिले जात असलेल्या कोटियनने आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली. त्याने १५४ चेंडूंचा सामना करताना ११ चौकारांसह नाबाद ८५ धावा केल्या आहेत.

त्याआधी, ईडन गार्डन्सच्या मैदानावर सुरुवातीच्या षटकांत गोलंदाजांना अपेक्षेनुसार मदत मिळाली. हरियाणाच्या वेगवान गोलंदाजांनी याचा पुरेपूर फायदा घेतला. यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी केलेल्या अंशुल कंबोजने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर आयुष म्हात्रेचा त्रिफळा उडवला. कंबोजने सिद्धेश लाड (४) याला फारकाळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. गेल्या सामन्यातील शतकवीर आकाश आनंद (१०) आणि सूर्यकुमार यादव (९) यांना सुमित कुमारने तंबूत धाडले. विशेष म्हणजे पहिले चारही फलंदाज त्रिफळाचित झाले. रहाणे आणि शिवम दुबे (२८) यांनी काही चांगले फटके मारले. मात्र, हे दोघेही माघारी परल्यानंतर तळाच्या फलंदाजांनी जबाबदारीने खेळ करताना मुंबईला तारले.

संक्षिप्त धावफलक

● मुंबई (पहिला डाव) : ८१ षटकांत ८ बाद २७८ (शम्स मुलानी ९१, तनुष कोटियन नाबाद ८५, अजिंक्य रहाणे ३१; अंशुल कंबोज ३/५८, सुमित कुमार २/५७)

Story img Loader